सोलापूर : आंबा हे उन्हाळी हंगामातील फळ म्हणून ओळखले जाते. मात्र, हिवाळ्याच्या सुरुवातीलाच सोलापूरच्याबाजारपेठेत आंबे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
एप्रिल आणि मे हा हापूस आंब्याचा मुख्य हंगाम असतानाही हिवाळ्यातच बाजारात कर्नाटक राज्यातील आंबे दाखल झाले आहेत. अस्सल तोतापुरी, लालबागप्रमाणेच असणारे आंबे बाजारात दरवर्षी जून महिन्यात येत असतो.
मात्र यावर्षी तो ऑक्टोबरमध्येच बाजारात दाखल झालेला हा बेमोसमी आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. निसर्ग नियमानुसार आंब्याच्या बहार वसंत ऋतूमध्ये मोहर येऊन होळीच्या सणानंतर आंब्याच्या कैऱ्या पाहावयास मिळतात.
मात्र, यावर्षी ऐन दसऱ्यानंतर बाजारात आंबे पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे बदलत्या काळामुळे निसर्गही बदलला तर नाही ना.. असा प्रश्न आंबे पाहणाऱ्यांना पडतो आहे.
उशिरा छाटणी केलेल्या झाडांना पोषक वातावरण मिळाल्याने ऑगस्टमध्येच मोहर येणास सुरुवात होते व ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फळे बाजारात येतात.
आंब्याला मोहर येण्यास सुरु
आता चांगली थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हंगामी आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. मोहर येण्याच्या प्रक्रियेपासून फळ तयार होण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे ९० दिवसांचा कालावधी लागतो. सर्वसामान्यांना परवडेल असा आंबा मार्चअखेर अथवा एप्रिल महिन्यांच्या सुरुवातीपर्यंत बाजारात दाखल होईल, असा अंदाज लक्ष्मी मार्केटमधील फळ विक्रेत्यांनी सांगितले.
हिवाळ्यात खाणे योग्य आहे का?
हिवाळ्यात हा आंबा आला आहे. मग यानंतर आता उन्हाळ्यातील हा केसर आंबा हिवाळ्यात खाणे योग्य आहे का?, तसेच आता हिवाळ्यात हा आंबा खाल्ल्याने आरोग्यावर काही परिणाम होतो का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मार्च-एप्रिलमध्ये बाजारात येणाऱ्या आंब्याला बाजारात पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. चवीला हंगामी आंब्यासारखे असल्याने नागरिक खरेदी करीत आहेत. दोनशे रूपये किलोनं विक्री होत आहे. - फरीद शेख, फळ विक्रेते लक्ष्मी मार्केट
जुलै आणि ऑगस्टमध्ये मिळालेला पोषक वातावरणामुळे झाडांना मोहर येण्यास सुरुवात होते. लालबाग आणि तोतापुरी कर्नाटक येथून आवक होते. हे फळ दरवर्षी बाजारात येईलच असे नाही. उशिरा छाटणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी आलेल्या मोहराची काळजी घेतल्यास ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अशी फळे येतात.- विजयकुमार बरबडे, निवृत्त कृषी उपसंचालक