Join us

असं काय घडतंय की सोयाबीनचा बाजारभाव वाढेना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:12 AM

केंद्र सरकारने टांझानिया, नायजेरिया, रोबो, आदी देशांतून सोयाबीनची आयात केली आहे. तसेच उतरलेले डीओसी व तेलाचे दर यामुळे सॉल्व्हंट प्लांट मालकासह सोयाबीन उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे.

शहाजी फुरडे-पाटीलबार्शी : केंद्र सरकारने टांझानिया, नायजेरिया, रोबो, आदी देशांतून सोयाबीनची आयात केली आहे. तसेच उतरलेले डीओसी व तेलाचे दर यामुळे सॉल्व्हंट प्लांट मालकासह सोयाबीन उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे. सोयाबीनच्या भावामध्ये मागील एक-दीड महिन्यात प्रतिक्विंटल एक हजार रुपयांची तूट झाली आहे.

सोयाबीनच्या लागवडीतही मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सोलापूर जिल्ह्यासह लातूर, धाराशिव, आदींसह मराठवाड्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले आहे. कच्चा माल उपलब्ध होत असल्याने या भागात सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ही निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे सोयाबीनचे दर ५५०० रुपये प्रतिक्विंटलवरून ४५०० रुपये खाली आले आहेत.

याचा परिणाम ४५०० रुपये क्विंटल असणारी डीओसी ही ४००० हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. तेलाचे दर ९५ रुपये किलोवरून ८५ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. या सर्वांचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीनचे दरदेखील तब्बल १००० रुपये क्विंटलने घसरले आहेत.

सोयाबीनचे दर जास्त असल्याने बँकांनी प्रतिक्विंटल ४७०० ते ५००० रुपयाने माल तारण घेऊन व्यापाऱ्यांना उचल दिले होते. आता बँकादेखील सोयाबीनचे दर उतरल्याने भाव फरकातील १४०० क्विंटल मागे भरा असे सॉल्व्हंट प्लांटधारकांना म्हणू लागल्याने प्लांटचालक अडचणीत आले आहेत.

त्यांच्या गाळप क्षमतेवरसुद्धा परिणाम झाला असल्याचे बार्शीतील दर्शना सॉल्व्हेंटचे दिलीप गांधी यांनी सांगितले. सोयाबीनचा हमीभाव हा ४६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, हमीभावापेक्षाही बाजारातील दर शंभर रुपयाने खाली आले आहेत म्हणजेच शासनाने हमीभाव केंद्राने सोयाबीन खरेदी करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेतकऱ्यांकडे ३५ टक्के माल पडूनबार्शी बाजार समितीत सध्या रोज २००० कट्टे सोयाबीनची आवक होत आहे. असे असताना आणखी शेतकऱ्यांकडेही दोन वर्षातील तब्बल ३५ टक्के माल घरात पडून आहे.

बार्शीत अडत दुकानदाराकडे २५ ते ३० हजार कट्टे आहेत. शहरातील विविध वेअर हाऊसमध्ये दीड लाख कट्टे आहेत, तर मालतारण योजनेंतर्गतही एक ते दोन लाख कट्टे सोयाबीन शेतकऱ्यांनी ठेवले आहे. एकंदरीत केवळ बार्शी तालुक्यात अडीच ते तीन लाख कट्टे सोयाबीन सध्या पडून आहे. - दिलीप गांधी, चेअरमन, दर्शना सॉल्व्हंट प्लांट

उन्हाळ्यामुळे वजनातही मोठ्या प्रमाणात घट होत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला ५२०० हून चा भाव पाहिलेला आहे. त्यामुळे आता ४४५० ते ४५०० प्रतिक्चिटलने सोयाबीन विकण्याची मानसिकता नाही. त्यामुळे सरकारने सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी आयात थांबवावी. - संतोष लोंढे, अडत व्यापारी

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डशेतकरीशेती