सध्या बाजारांत कापसाचे कमीत कमी दर हे साडेपाच हजारांच्या तर सरासरी दर सहा हजारांच्या आसपास असल्याचे दिसून येत आहे. यंदा कापसाचा ७ हजार २० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर झाला आहे. मात्र सध्या तरी हमीभावापेक्षा कमीच दराने शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे.
अनेकांनी भविष्यात भाव वाढतील या आशेने घरात कापूस साठवून ठेवला, पण आता या साठवलेल्या कापसाला बारीक कीड लागत असून त्यामुळे शेतकऱ्याच्या घरातील सदस्यांना त्वचारोग, ॲलर्जी अशा आजारांना सामोरे जावे लागतेय. त्यामुळे नाईलाजाने कमी भावात शेतकरी कापूस विकताना दिसत आहेत. मात्र ज्यांच्याकडे कापूस साठविण्याची चांगली सोय आहे, अशा शेतकऱ्यांना भविष्यात भाव वाढण्याची अपेक्षा आहे.
साठवलेला कापूस खाणार का भाव?
एप्रिल ते जून दरम्यान कापसाचे भाव किती असतील याचा अंदाज कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्ष, पुणे यांनी वर्तविला आहे. या विभागातर्फे दर आठवड्याला बाजार माहितीचे अंदाज आणि विश्लेषण केले जाते. (त्यासंदर्भातील संपर्क क्रमांक तळाशी दिलेला आहे.)
सरकारने व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी कापूस खरेदी करावी
आयात निर्यातीचा कल असा आहे
कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे जे 'व्हाइट-गोल्ड' म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी 25% वाट भारताचा आहे आहे. राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत, मागील वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये आयातीत 55% वाढ आणि निर्यातीत 23% घट होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयातीत 3.84% वाढ आणि निर्यातीत 1.81% घट झाली आहे.
यंदाचे कापूस उत्पादन असे असेल
गेल्या वर्षी 14 वर्षांमधील नीचांकी उत्पादनावर गेल्यानंतर,भारतातील कापूस पीक 337 लाख गाठी म्हणजे गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत 26 लाख गाठींनी जास्त असल्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात बाजारात कापसाची आवक गतवर्षीप्रमाणेच असल्याचे दिसून येत आहे.
2023-24 मध्ये जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ वाढण्याची अपेक्षा आहे (0.5 टक्के किंवा 600,000 गाठी) ते 115.0 दशलक्ष गाठी युनायटेड स्टेट्समध्ये जास्त उत्पादनाची अपेक्षा तसेच चीन, तुर्कस्तान आणि पाकिस्तान मध्ये कमी उत्पादनाचा अंदाज आहे. (स्रोत: USDA-Cotton Outlook)
कापूस दराचा आढावा
अकोला बाजारपेठेत कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत. मागील तीन वर्षातील एप्रिल ते जून या कालावधीतील कापसाच्या किमती पुढील प्रमाणे
एप्रिल ते जून २०२१ - रु ६,८२४ प्रति क्विंटल
एप्रिल ते जून २०२२ - रु ११,६१८ प्रति क्विंटल -
एप्रिल ते जून २०२३ - रु ७,९८३ प्रति क्विंटल
भविष्यातील किंमतीचा अंदाज
वरील प्रमाणे उत्पादन आणि आयात-निर्यात या माहितीवरून पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षातील तज्ज्ञांनी कापसाचा एप्रिल ते जून महिन्याचा अंदाज दिला आहे. त्यानुसार एप्रिल ते जून २०२४ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे रु. ७,००० ते ८,००० प्रति क्विंटल अशा राहण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प
एम.एस.एफ.सी बिल्डींग, २७० भाम्बुर्डा, नारायण एस.बी.मार्ग, सिंबायोसिस कॉलेज,
गोखले नगर, पुणे ४११०१६ फोनः ०२०-२५६५६५७७, टोल फ्रीः १८०० २१० १७७०.