Join us

जुलैमध्ये कापसाचे भाव काय असतील? साठवलेला कापूस विकावा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 09:05 IST

अनेक शेतकऱ्यांनी आजही कापूस साठवून ठेवला आहे. तो विकण्यासाठी ते भाव वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने आजही कापूस साठवून ठेवला आहे. तर काहींनी लग्नसराई आणि खरिपासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तरतुदीसाठी कापूस विकायला सुरूवात केली आहे. मात्र अनेकांना पुढे भाव कसे असतील याची उत्सुकता आहे. पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन विभागाच्या तज्ज्ञांनी यावर अंदाज व्यक्त केला आहे.

कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे जे 'व्हाइट-गोल्ड' म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी २५% वाटा भारताचा आहे.

राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत, मागील वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये आयातीत ५५% वाढ आणि निर्यातीत २३% घट होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयातीत ३.८४% वात आणि निर्यातीत १.८१% घट झाली आहे.

वर्ष २०२१-२२ मधील कापसाचे उत्पादन गेल्या १४ वर्षांमधील निचांकी पातळीवर गेल्यानंतर, भारतातील कापूस पीक ३३४ लाख गाठी म्हणजे गेल्या वर्षाच्या उत्पादनाच्या तुलनेत २३ लाख गाठींनी जास्त असल्याचा अंदाज आहे.

मार्च महिन्यात बाजारात कापसाची आवक गतवर्षीप्रमाणेच असल्याचे दिसून येत आहे.

२०२३-२४ मध्ये जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ वाढण्याची अपेक्षा आहे (०.५ टक्के किंवा ६,००,००० गाठी) ते ११५ दशलक्ष गाठी युनायटेड स्टेट्समध्ये जास्त उत्पादनाची अपेक्षा तसेच चीन, तुर्कस्तान आणि पाकिस्तान मध्ये कमी उत्पादनाचा अंदाज आहे. (स्रोत: USDA-Cotton Outlook)

अकोला बाजारपेठेत कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत. मागील तीन वर्षातील जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील कापसाच्या किमती पुढील प्रमाणेजुलै ते सप्टेंबर २०२१: रु ७,२८६ प्रति क्विंटलजुलै ते सप्टेंबर २०२२: रु १०,१५४ प्रति क्विंटलजुलै ते सप्टेंबर २०२३: रु ७,४०७ प्रति क्विंटल

बाजार माहिती आणि विश्लेषण विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे रु. ७,००० ते ८,५०० प्रति क्विंटल असे राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी त्या वेळच्या स्थितीनुसारच सारासार विचार करून आपल्या कापसाची विक्री करावी.

टॅग्स :कापूसकॉटन मार्केटशेतकरीशेती