भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तुरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात कोटा मर्यादित ठेवलेला आहे. विदेशी व्यापार महासंचालनालय (DGFI) ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार तुरीसाठीचे - मुक्त आयात धोरण मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आले आहे.
माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष ऑक्टोबर २०२२-२३ मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये २.१ लाख टन होती, जी मागील वर्षी याच कालावधीत २.९ लाख टन होती.
तुरीच्या उत्पादनाचा अंदाज तूर हे खरीप पीक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३४.२१ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी जास्त आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन ९.२ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये ८.७ लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
मागील वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये आयात वाढलेली आहे तर निर्यात कमी झालेली आहे. डिसेंबर २०२२ पासून तुरीच्या किंमती वाढत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव जास्त आहेत.मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या जानेवारी ते मार्च मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणे:
- जाने ते मार्च २०२१: रु. रु. ६.४९८/क्विंटल
- जाने ते मार्च २०२२: रु. ६.३१०/क्विंटल
- जाने ते मार्च २०२३: रु.७,७३५/क्विंटल
सध्याच्या हंगामासाठी सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (रु. ७०००/क्विंटल) सध्याच्या तुरीच्या किंमती जास्त आहेत. महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष येथील तज्ज्ञांनी तुरीबाबतचा हा अंदाज वर्तविला आहे. जानेवारी ते मार्च २०२४ या काळात तुरीचे संभाव्य दर काय असतील याची तूर उत्पादकांना उत्सुकता असणार आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत चालू वर्षातील आयात जास्त राहील असे गृहीत धरून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे, असे या कक्षाने म्हटले आहे.
लातूर बाजारातील तुरीच्या संभाव्य किंमतीजानेवारी - मार्च २४ : ७००० ते ८००० रु. प्रति क्विंटल
(सौजन्य:स्मार्ट प्रकल्प, पुणे, संपर्क : ०२०-२५६५६५७७)