Wheat Market :
वाशिम : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. प्रकल्प, तलावामध्ये मुबलक जलसाठा असल्याने शेतकऱ्यांची गव्हाला पसंती मिळत आहे. बाजारातही जुना गहू दाखल झाला आहे.
मागील चार महिन्यांत क्विंटलमागे ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची दैनंदिन आवक देखील वाढल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी रब्बी आणि खरीप या दोन हंगामातील पिकांवरच विसंबून असतात. खरीपात अन्य पिकांच्या तुलनेत सोयाबीनचा; तर रब्बीमध्ये हरभरा पिकाचा पेरा अधिक असतो.
यावर्षी देखील रब्बी हंगामात गव्हाचे सरासरी पेरणी क्षेत्र ३८ हजार ५०० हेक्टर असून त्यातुलनेत हरभऱ्याच्या पेरणीचे क्षेत्र ८२ हजार ५०० हेक्टर इतके आहे. गव्हाच्या लागवड क्षेत्रात घट झाल्याने उत्पन्नावरही परिणाम झाला असून याच कारणामुळे यंदा गव्हाच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
खुल्या बाजारात गव्हाच्या दराने गाठला विक्रम !
• कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांच्या उच्च प्रतिच्या गव्हाला २ हजार ९०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
• त्यातुलनेत खुल्या बाजारात मात्र हलक्या प्रतिचा गहू ३ हजार ४०० रुपये; तर उच्च प्रतिचा गहू तब्बल ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे.
तथापि, बाजार समिती आणि खुल्या बाजारात दरातील या प्रचंड प्रमाणातील तफावतीमुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
गहू राखून ठेवणारे शेतकरी फायद्यात !
• जिल्ह्यात गव्हाचे लागवड क्षेत्र जेमतेम आहे. त्यामुळे उत्पन्न देखील फारसे नाही.
• विशेष म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांत लागवड आणि एप्रिल ते मे महिन्यांत गव्हाची काढणी प्रक्रिया पूर्ण होते; तर जुलै महिन्यापर्यंत शेतकरी गहू विकून मोकळे होतात. ज्या शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने गहू राखून ठेवला होता, ते सध्या गव्हाची दरवाढ झाल्याने फायद्यात आहेत. तर ज्यांनी गहू विकण्याची घाई केली, त्यांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
असे आहेत खुल्या बाजारातील दर
जुलै महिन्यांत गव्हाचे दर | २,२७० ते २,५३० |
नोव्हेंबरमधील दर | २,६८० ते २,९०० |
नोव्हेंबरमधील दर | ३,४०० ते ३,८०० |