वाशिम जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या गव्हाची दैनंदिन आवक घटली आहे. परिणामी, दराने चांगलीच उसळी घेतली असून, वाशिमचा अपवाद वगळता मानोरा, मंगरूळपीर, कारंजा या बाजार समित्यांमध्ये गव्हाला २२ जुलै रोजी प्रतिक्विंटल २५०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला.
ज्या शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने गहू राखून ठेवला होता, त्यांना फायदा झाला. मात्र, अशा शेतकऱ्यांची संख्या फारच कमी असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि रिसोड या चार प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, तर मालेगाव आणि मानोरा येथे उपबाजार कार्यान्वित आहे. दरम्यान, जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची या बाजार समित्यांमध्ये बारमाही आवक असते.
त्यामुळे या शेतीमालाचे दर बहुतांशी स्थिर राहतात. मात्र, अन्य शेतीमालाची आवक तुलनेने कमी राहत असल्याने त्यांचे दर कमी-जास्त होतात.
सद्य:स्थितीत सोयाबीनला ४००० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. गव्हाचे दर काही आठवड्यांपूर्वी २०००च्या आसपास होते. ते आता वाढून २५०० पेक्षा अधिक झाले आहेत, तर ज्वारीच्या दरातही २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र, माल शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना फायदा मिळणे अशक्य झाले आहे.
खुल्या बाजारात गहू, ज्वारीचे दर
२९५० ते ३६०० गहू
२२०० ते ३००० ज्वारी
कोणत्या वाणाला किती दर? (प्रतिक्विंटल)
सोयाबीन | ४१६५ - ४३२० |
गहू | २५१० - २५७५ |
ज्वारी | २१०० - २२८५ |
तूर | ९७०० - १०७०० |
मूग | ७२०० - ७२३० |
भूईमूग शेंग | ५४०० - ६३०० |
चना | ५५०० - ६५५० |
क्वॉलिटी हवी तर मोजा ३५०० रुपये
• खुल्या बाजारात दर्जेदार गव्हाचे दर सध्या प्रचंड वधारले आहेत. प्राप्त माहितीनुसार, २९५० रुपये प्रतिक्विंटलचा गहू तुलनेने हलका आहे.
• तर सर्वात चांगल्या गव्हाला ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
खुल्या बाजारापेक्षा गव्हाचे दर कमीच
• वाशिम शहरातील व्यापाऱ्यांकडे सर्वात हलक्या प्रतीचा गहू सध्या २९५० रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे.
• बाजार समित्यांमध्ये त्याच प्रतिच्या गव्हाला प्रतिक्विंटल २५०० रुपये दर मिळत असल्याचे दिसत आहे.
सोयाबीनची आवक सर्वाधिक; दर मात्र अगदीच कमी
जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दैनंदिन होत असलेल्या शेतीमालात सोयाबीनचे प्रमाण सर्वाधिक असते. ही स्थिती खरीप हंगाम सुरू असतानाही कायम आहे. मात्र, या शेतीमालाचे दर चांगलेच गडगडल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.