गजानन मोहोड
अमरावती : गव्हाची साठेबाजी होऊन काळाबाजार व कृत्रिम टंचाई व दरवाढ होऊ नये, यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२५ या कालावधीपर्यंत ठोक, घाऊक विक्रेता व प्रोसेसर्स या सर्व घटकांना साठ्याची लिमीट ठरवून दिलेली आहे.
केंद्र व राज्याच्या संयुक्त पथकाद्वारा साठ्याची नियमित तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व स्तरावर गव्हाच्या साठ्याची माहिती रोज ऑनलाइन (Online) व अपडेट (Update) ठेवावी लागणार आहे.
शिवाय साठा मर्यादेचे उल्लंघन झाल्यास पथकाद्वारा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली. ठोक, घाऊक विक्रेता, मोठे साखळी विक्रेते व प्रोसेसर्सला यांना गहू स्टॉक पोर्टलवर (Wheat Stock Portal) नोंदणी करावी लागणार आहे. याद्वारे शासनाद्वारा गव्हाची साठेबाजी नियंत्रित करण्यात येऊन पुरवठा व मागणी यांच्यात संतुलन राखल्या जाणार आहे. या अनुषंगाने पुरवठा विभाग आता कामाला लागला असल्याचे दिसून येत आहे.
पथकाच्या अहवालास १४ फेब्रुवारी डेडलाइन
पुरवठा विभागाचे ३ फेब्रुवारीचे पत्रानुसार भारतीय अन्न महामंडळाचे अधिकारी, गुण नियंत्रण कक्ष, पुरवठा विभाग, भारत सरकारचे अधिकारी आणि राज्य शासनाचे अधिकारी असलेल्या पथकाद्वारे व्यापाऱ्यांच्या गोदामाची पाहणी करण्यात येईल.
पुरवठा विभागाला जास्तीत जास्त तपासण्या करण्याचे निर्देश आहेत. याबाबतचा अहवाल पथकाला १४ फेब्रुवारीपूर्वी सादर करावा लागेल, याबाबतचा फॉरमॅट यंत्रणेला देण्यात आलेला आहे.
व्यापाऱ्यांची 'एफजीएल' नोंदणीच नाही
जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची पुरवठा विभागाकडे 'एफजीएल' (Food Grain Licence) नोंदणीच नाही व तशी तरतूद नाही. त्यामुळे गव्हाचे व्यापाऱ्यांचा आकडा निश्चित किती? याची माहिती पुरवठा विभागाकडे नाही. अशा परिस्थितीत पथकाला जिल्ह्यातील एकेका व्यापाऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचे १२५ वर व्यापारी असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली. १० मे. टन लिमीट, ठोक, घाऊक विक्रेता, मोठे साखळी विक्रेते व प्रोसेसर्सला बंधनकारक करण्यात आले आहे.
....तर व्यापाऱ्यावर कारवाई
हंगामापूर्वी गव्हाची टंचाई होऊन दरवाढ होते व याचाच फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांद्वारा गव्हाची साठेबाजी करुन कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. नफाखोरीसाठी असा प्रकार होऊ नये, यासाठी आता संयुक्त पथकाची करडी नजर राहणार आहे व साठेबाजांवर मर्यादेपेक्षा जास्त गव्हाची साठवणूक करता येणार नाही. यामध्ये साठेबाजी झाल्याचे आढळल्यास व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
गहू व्यापाऱ्यांना संबंधित पोर्टलवर साठ्याबाबतची माहिती पोर्टलवर नियमित द्यावी लागेल. मर्यादेपेक्षा जास्त साठा करू नये, तपासणीत अधिक साठा आढळून आल्यास कारवाई केली जाईल. - निनाद लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी