भारत चव्हाण
शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही, ही बाब गव्हासाठीही (Wheat_market) लागू आहे. जो गहू शेतकऱ्यांकडून २० ते २२ रुपये किलो प्रमाणे विकत घेतल्या जातो. तोच गहू ग्राहकांना खुल्या बाजारात ३५ ते ३८ रुपये किलो मिळत असल्याचे चित्र सारकिन्ही परिसरात दिसत आहे.
लग्नसराईचे जास्तीत जास्त धामधूम असल्यामुळे ग्राहकांना खुल्या बाजारातून गहू ज्यादा दराने विकत घेण्याची वेळ आली आहे. दरातील या फरकाचा लाभ उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या घशातच अधिक जात आहे. त्यातच शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणाऱ्या गव्हाला दर मिळत नाही आणि माल संपतो, तेव्हा दर वाढतात.
शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन तो खुल्या बाजारात अव्वाच्या सव्वा दरात विकल्या जातो.
असे आहेत दर
• रब्बी हंगामात पिकलेला नवा गहू विक्रीसाठी आणला जात आहे. शेतमालाला सध्याचे भाव २००० ते २२०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळत आहे.
• मात्र, हाच गहू व्यवस्थित पॅकिंग करून खुल्या बाजारात ३००० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विक्री करून व्यापारी जास्तीत जास्त नफा कमावत असल्याचे चित्र सारकिन्ही परिसरात दिसत आहे.
यावर्षी सुरुवातीपासून खर्च जास्त, उत्पादन कमी राहत असल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामातील गहू पिकावर आशा होती. त्यामुळे गहू पिकाची पेरणी केली होती. गहू पिकांचे चांगले उत्पादनही काढले. परंतु बाजारात गहू विक्रीसाठी घेऊन गेलो तर २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हेच गहू व्यापारी ३००० हजार रुपये प्रतिक्विंटल विक्री करतात. - राजेश गायकवाड, शेतकरी.
तीन एकरात गहू पिकाची पेरणी केली. गेल्यावर्षी ४० क्विंटल उत्पादन झाले होते आणि यावर्षी तीन एकरामध्ये ३० क्विंटल उत्पादन झाले. यावर्षीचे स्थिती खर्च जास्त, उत्पादन कमी आहे. गहू विक्रीसाठी बाजारात घेऊन गेलो तर प्रति क्विंटल २ हजार रुपये भाव मिळाले आणि हेच गहू व्यापारी ३ ते ३.५ हजार रुपये क्विंटल प्रमाणे ग्राहकांना विकतात. - प्रकाश आगे, शेतकरी, सारकिन्ही.
शेतात दोन एकर गहू पिकांची पेरणी केली आहे. गेल्यावर्षी एकरी 15 क्विंटल उत्पादन झाले. परंतु, यावर्षी १० क्विंटल झाले. यावर्षी उत्पादन कमी आणि भावही कमी आहेत. गहू विक्रीसाठी बाजारात घेऊन गेलो तर २ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. - चंद्रशेखर राठोड, शेतकरी, जनुना.
लागवड खर्च अधिक
एकीकडे शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही तर दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंब हैराण झाले आहे. लागवड खर्च आणि कठीण परिश्रमाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या गव्हाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - Banana Success Story पारंपरिक पिकांना फाटा देत लागवड केलेली वरुडची केळी गेली आता इराकला