Join us

निर्यात वाढल्याने गहू, सरकी ढेप वधारले; हरभरा अन् सोयाबीनच्या दरात चढ-उतार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 11:55 AM

बाजारातील आवक वाढल्यानंतर ज्वारीतील तेजी कमी झाली...

संजय लव्हाडे

पावसाळ्याची सुरुवात चांगली झाल्यामुळे बाजारपेठेत शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे. बियाणे व खत खरेदीसाठी दुकानांवर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. गहू, बाजरी, सोयाबीन, मका, सरकी ढेप या वस्तुमालांचे दर तेजीत असून ज्वारी, तूर, हरभरा, सोने चांदीचे दर घसरले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशातील गहू दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा संबंध असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. प्रामुख्याने चीन, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि युक्रेन हे देश जागतिक गहू उत्पादनात आघाडीवरील देश आहेत. मात्र, प्रमुख गहू निर्यातदार देश असलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये यावर्षी गहू उत्पादनात मोठी घट नोंदविली गेली आहे.

ज्याचा थेट परिणाम जागतिक गहू उत्पादनावर झाला असून, कमी उत्पादनाअभावी दरात तेजी पाहायला मिळत आहे. परिणामस्वरूप, भारतात देखील काही काळापासून गहू दरात तेजी पाहायला मिळत आहे. जालना बाजारपेठेत गव्हाचे दर २४०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार दिसून आले.

काही ठिकाणी बाजारात ५० रुपयांपर्यंतची तेजी आली होती, तर अनेक ठिकाणी बाजार स्थिर होता. सोयाबीनचे दर सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून सरकी ढेपचे भाव घसरलेले होते. मात्र, सरत्या आठवड्यामध्ये त्यात १०० ते १५० रुपयांची तेजी बघायला मिळाली. कापसाच्या दरातही ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली. सरकी ढेपचे दर ३१०० ते ३३०० आणि कापसाचे दर ७००० ते ७६०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत. रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन चांगले आल्याचे व्यापारी सांगत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी उत्पादन कमी राहिल्याचे कळवत आहेत, पण बाजारातील आवक वाढल्यानंतर ज्वारीतील तेजी कमी झाली.

ज्वारीला मागील काही आठवड्यांपासून २ हजार ३०० ते ३ हजार ५०० चा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस असेच स्थिर राहू शकतात. त्यानंतर ज्वारीच्या दरामध्ये मोठी तेजी येण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

जालना बाजारपेठेतील बाजारभाव (कंसात दररोजची आवक)

गहू (४०० पोते)२५०० ते ३३०० रुपये प्रति क्विंटल
ज्वारी (१३०० पोते)२००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल
बाजरी (२५० पोते)२१०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल
मका (५० पोते)२२५० ते २५५० रुपये प्रति क्विंटल
तूर (१०० पोते)९००० ते ११५०० रुपये प्रति क्विंटल
हरभरा (१०० पोते)५५०० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल
मूग (आवक नाही)७००० ते ८००० रुपये प्रति क्विंटल
सोयाबीन (१५०० पोते)४१०० ते ४४५० रुपये प्रति क्विंटल

सोन्याच्या दरात घट

* सोन्याच्या दरात सातत्याने बदल होत असल्याने ग्राहकांमध्ये दागिने खरेदीबाबत संभ्रम आहे. मागील आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात तेजी आली होती.

* मात्र, शनिवारी सोन्याचे दर तोळ्यामागे एक हजार रुपयांनी, तर चांदीचे दर किलोमागे एक हजार रुपयांनी घसरले. जालना बाजारपेठेत सोन्याचे दर ७२ हजार रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर ८९ हजार रुपये प्रति किलो असे आहेत.

हेही वाचा - आरोग्यासाठी फायद्याचे मात्र आता होत आहे दुर्मिळ; जाणून घ्या कोणते आहेत हे भरडधान्य

टॅग्स :बाजारशेती क्षेत्रशेतीसोयाबीनगहूज्वारीसोनंमार्केट यार्ड