Join us

आवक मंदवल्याने गव्हाला मिळणार चांगला भाव, पहा काय मिळतोय दर..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 11:21 AM

नवा गहू उपलब्ध होण्यासाठी लागणार महिन्याच्या वर कालावधी

हिंगोली येथील मोंढ्यासह खुल्या बाजारात गव्हाची आवक मंदावली आहे. नवीन गहू उपलब्ध होण्यासाठीही जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या गव्हाचे भाव वधारले असून, मोंढ्यात तीन ते साडेतीन हजार, तर खुल्या बाजारात एक क्विंटल गव्हासाठी किमान चार हजार रुपये मोजावे लागत आहेत.

शेतकऱ्यांकडे नवीन गहू उपलब्ध होण्यासाठी जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागणार असून, जुना गहूही विक्रीसाठी शिल्लक नसल्यामुळे आवक मंदावत आहे. हिंगोलीच्या मोंढ्यात सध्या सरासरी ३० ते ३५ क्विंटलची आवक होत आहे. आवक मंदावल्यामुळे भाव वधारले आहेत. सध्या किमान २ हजार ते कमाल ३ हजार ५०० रुपये क्विंटलवर गहू पोहोचला आहे.

मोंढ्यात भाव वधारल्याने खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी गव्हाची भाववाढ केली आहे. खुल्या बाजारात किरकोळ दरात गहू उपलब्ध होतो. त्यामुळे मोंढयापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. तर, मोंढ्यात कमीत कमी एक क्विंटलच्या वर गव्हाची खरेदी करावी लागते. त्यामुळे काही प्रमाणात दर कमी लागतो. परंतु, सध्या मोंढा आणि खुल्या बाजारातही आवक मंदावत असल्यामुळे गव्हाचे भाव वधारल्याचे चित्र आहे. विक्रीसाठी गहू शिल्लक नसल्याने या भाववाढीचा फारसा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

किराणा दुकानात क्विंटलमागे हजाराचा फरक

मोंढा आणि किराणा दुकानातील गव्हाच्या किमतीत क्चिटलमागे जवळपास सातशे ते एक हजार रुपयांचा फरक आहे. किराणा दुकानात पाच- दहा किलो गहू खरेदी करता येतो. तर. मोंढ्यात मात्र क्विंटलने गहू खरेदी करावा लागतो. त्यामुळे भावात फरक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.यंदा गव्हाचा पेरा घटला

यंदा गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी गव्हापेक्षा हरभऱ्याला पसंती दिली. त्यामुळे गव्हाचा पेरा घटला असून, हरभऱ्याचा वाढला आहे. पेरा घटल्यामुळे यंदा गव्हाचे भाव गतवर्षीच्या तुलनेत वधारण्याची शक्यता आहे. सध्या मोंढ्यात दोन ते साडेतीन हजार रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. तर, खुल्या बाजारात जवळपास चार ते साडेचार हजार रुपये मोजावे लागत आहेत.

गहू आणखी महागणार

नवीन गहू बाजारात येण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. तर, दुसरीकडे सध्या आवकही मंदावली आहे. गव्हाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बाजारात सध्या गव्हाची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाव काही प्रमाणात वधारले आहेत. नवीन गहू उपलब्ध होण्यासाठी अजून बरेच दिवस शिल्लक आहेत. आवक आणखी मंदावली तर भावात वाढ होईल. - श्याम बजाज

यंदा गव्हापेक्षा हरभऱ्याचा पेरा अधिक आहे. तसेच, नवीन गहू येण्यासाठीही एक ते दीड महिना शिल्लक आहे. - लिबाजी तनपुरे, शेतकरी, सवड

हेही वाचा- पारंपरिक अशा जुन्या 'जोड गव्हाचे' घेतले उत्पादन, अन्य वाणांच्या तुलनेत ५० टक्के अधिक दराने विक्री 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

https://chat.whatsapp.com/C4PI000UzoO6Nxvnhfn8q1

 

टॅग्स :गहूबाजारमार्केट यार्ड