Join us

जागतिक बाजारात कापसात तेजी असताना, देशात कमी भाव का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 6:25 PM

कापूस आयातीवरचा ११ टक्के कर केंद्र सरकारने शून्यावर आणला. त्यामुळे देशातील कापसाचे बाजारभाव वधारण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊ यावरचे विश्लेषण.

विजय जावंधिया 

या आठवड्यात जागतिक कापूस बाजारात तेजीचे वातावरण तयार झाले आहे. ९० ते ९२ सेंट प्रति पाऊंड रुईचे भाव एक डॉलर दोन सेंटच्या आस पास आहेत. आजचा भाव १.१६ डॉलर प्रती पाऊंडचा आहे. या हिशेबाने जागतिक बाजारात ७० से ७२ हजार रु प्रत्ती खण्डी रुईचे भाव होतात.

तो हिशेब असा

  • एक पाऊंड रुईचा भाव १.१६ डॉलर 
  • २.२ पाउंड म्हणजे एक किलो.
  • १.१६×२.२ = २.५५२ डॉलर प्रती किलो.
  • ३५० किलो रुई म्हणजे एक खंडी
  • २.५५२ X ३४० = ८६७.६८ डॉलर
  • एक डॉलर म्हणजेच ८३ रुपये ८६७.६८×८३=७२०१७.४४ रुपये प्रती खंडी

दोन वर्षापूर्वी जागतिक बाजारात एक लाख रुपये खंडी असे रुईचे भाव झाले होते. ते आज ७० ते ७२ हजार रु. झालेले आहेत. रशिया-युक्रेन व  इस्त्रायल-गाझा युद्धामुळे निर्यात प्रभावित झाली होती. आजही समुद्री वाहतूक खर्च वाढला आहे.

भारत सरकार ने कालच कापूस आयातीवरचा ११ टक्के आयात कर शून्य केला आहे. भारतातून २०११ - २०१२ साली विक्रमी ८० लाख गाठींची निर्यात झाली आहे. या वर्षी पण ४०-५० लाख गाठींची निर्यात होवू शकते.

या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार ने कापूस निर्यातीला वाहतूक सबसीडी देण्याची घोषणा करावी व देशाच्या रूई बाजारात ७० ते ७५ हजार रुपये खंडीचे रुईचे भाव टिकून राहतील अशी व्यवस्था केली, तर शेतकऱ्यांना ८ हजार साडे आठ हजार रुपये भाव मिळण्याची हमी दिली जाऊ शकते.

तेजी असताना देशात ५८ ते ६० हजार रूपये खंडीचा भाव हा अन्याय करणारा आहे. व मोदीजींच्या 5F फॉर्म्युलाचे अवमूल्यन करणारा आहे. कापडाचे भाव कमी झालेले नसताना रूई (कापूस)स्वस्त का? याचे उत्तर कोण देणार ?

(लेखक शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि कृषी अभ्यासक आहेत.)

टॅग्स :कापूसकॉटन मार्केटशेतकरीशेती क्षेत्र