उन्हाळा म्हटलं की आंबा हे ठरलेलं. आंबा खाण्याचा खरा हंगाम म्हणजे मे महिना. एप्रिल महिन्यापासून बाजारात आंब्याची आवक वाढलेली असते. मात्र आता डिसेंबरमध्येच आंबे बाजारात येऊ लागले आहेत.
मात्र, सध्या कोकणचा हापूस आंबा अजून हवा तसा बाजारात उपलब्ध झालेला नाही. बाजारात येत असलेल्या हापूस आंब्याचे दर डझनाला दीड, दोन हजार रुपये आहे. त्यामुळे आंब्याचे दर अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.
बाजारात सध्या रायवळ आंबा तीनशे ते चारशे रुपये दराने विक्रीला आहे. मात्र या आंब्याला हापूस आंब्याच्या तुलनेत मागणी कमी असते. यावर्षी मार्च सुरू होताच बाजारपेठेत आंबा विक्रीस उपलब्ध झाला आहे. ग्राहकही आवडीने आंब्याची चव चाखत आहेत. एप्रिल महिन्यात आंब्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
अवकाळीने नुकसान■ कोकण पट्ट्यात अवेळी पावसाने अनेकदा हजेरी लावल्याने आंबा बागा- यतीवर परिणाम होऊन नुकसान झाले आहे.■ मागील महिन्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे आंब्याचा मोहर गळून पडल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले.■ पावसात आंबा भिजल्यानंतर त्याची चव कमी होते. त्यामुळे दरातही घट होते. मात्र, आंबाही अद्याप तयार झाला नसल्याने बाजारातील आवक वाढायला वेळ लागेल. त्यामुळे आंबाप्रेमींना चव चाखण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
आंब्याचे भाव कमी कधी होणार?सद्य:स्थितीत बाजारपेठेत कर्नाटकी आंबा विक्रीला असून तोतापुरी, नीलम अद्याप विक्रीस उपलब्ध झालेले नाहीत. आंब्याच्या या प्रजाती बाजारपेठेत उपलब्ध झाल्यास भाव कमी होतील.
आंबा १,२०० रुपये डझनकोकणचा आंबा हा चवीला उत्तम असल्याने त्याला अधिक मागणी असते. बाजारात कर्नाटकचाही हापूस येत असतो. मात्र, त्याला कोकणच्या आंब्याची चव नाही. कोकणचा आंबा हा नेहमीच दरात वरचढ असतो.
सध्या बाजारात येत असलेल्या हापूस आंब्याचा दर हा हजारांहून अधिक आहे. बाजारपेठेत हजार ते बाराशे रुपये डझन हापूस आंबा विक्रीस उपलब्ध आहे. याबरोबरच लालबागचा आंबा २४० रु. प्रति किलो, बदाम १५० रु., तर केशर २५० रु. प्रति किलोने विक्रीस उपलब्ध आहेत.
सध्या बाजारपेठेत हापूससह इतर प्रकारचे आंबे व्रिकीला आले आहेत. देवगड हापूस १००० ते १२०० रुपये दराने विक्री सुरू आहे. काही प्रमाणात ग्राहक आंब्याची खरेदी करत आहेत. लालबाग, तोतापुरी, नीलम, केसर हे आंबे जेव्हा अधिक प्रमाणात बाजारपेठेत येतील, तेव्हा दर आणखी कमी होतील. एप्रिल-मेमध्ये आंब्याची आवक वाढेल. - जमील बागवान, व्यापारी