अलिबाग : अलिबाग-वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीची दुकाने सजली आहेत. मात्र, यंदा या कांद्याची माल ५० रुपयांपेक्षा अधिक स्वस्त असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यंदा एक माळ (सुमारे दोन किलो) दीडशे ते अडीचशे रुपये दराने विकण्यात येत आहे. अलिबागमध्ये आलेले पर्यटक आवर्जून हा कांदा खरेदी करतात.
अलिबाग तालुक्यातील कार्ले, नेहुली, वेश्वी, वांडगाव, मुळे, धोलपाडा, खंडाळे, रुळे, तळवळी या गावांत पांढरा कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलिबागमधील २५० हेक्टरवर कांदा लागवड करण्यात येते.
विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी या कांद्याची एक माळ ३०० रुपये दराने विकण्यात येत होती. यंदा दीडशे ते अडीचशे रुपये दराने विकण्यात येत आहे. यंदा या पिकाची उलाढाल ही सुमारे ३ कोटींची आहे. दरवर्षी कांदा लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशी माहितीही शेतकऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे डोळे- अलिबागचा कांदा खरेदीसाठी व्यापारी वर्ग हा काढणी आधी शेतकऱ्याकडे येत असतो.- गतवर्षी माळेला १४०० रुपये दर व्यापारी यांच्याकडून देण्यात आला होता.- यावेळी आठशे ते अकराशे दर दिला जात आहे. मात्र, उत्पादन अधिक वाढले असल्याने व्यापारीवर्गाने सध्या पाठ फिरवली आहे.- भाव कमी होईल या आशेने व्यापारी आलेले नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापारी येण्याकडे डोळे लागले.
पर्यटक हमखास खरेदी करतात.- आपला पांढरा कांदा विकण्यासाठी शेतकऱ्याने रस्त्यावर आपले दुकान थाटले आहे. त्यामुळे अलिबाग-वडखळ मार्गावर सध्या कांदा विक्रीस दिसू लागला आहे.- छोट्या कांद्याची माळ दीडशे, तर मोठी माळ अडीचशे रुपये दराने मिळत आहे.- अलिबाग हे पर्यटनस्थळ असल्याने येणारे पर्यटक आवर्जून माघारी निघताना पांढरा कांदा खरेदी करीत आहेत.- व्यापारी आले नसले तरी शेतकऱ्यांचा माल हा विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांढरा कांद्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.
अलिबागमध्ये यंदा २९० हेक्टर क्षेत्रामध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड आहे: परंतु अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. तरीही त्यावर मात करीत लागवड योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी प्रयत्न केले. या व्यवसायातून सुमारे दीड हजार महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. - संदीप कदम, प्रगतिशील शेतकरी