महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारण्याच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील ११ बाजार समिती सोमवारी बंद राहणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे बाजार समिती प्रशासनाने कळविले आहे.
जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्या तर राष्ट्रीय बाजारतळ उपबाजार तळे, उपतळ निर्माण करणे, आइते, हमाल मापाडी, आदी घटकांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे राज्यस्तरावरील बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कायद्यात बदल करू नये, या प्रमुख मागणीसाठी २६ फेब्रुवारीला एक दिवसाचा लाक्षणिक संप स्थानिक पातळीवर बाजार समितीच्या वतीने पुकारण्यात येणार आहे.
सोमवारी ११ बाजार समित्या बंद राहणार असून, सर्व शेतीमालाचे लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. याची शेतकरी, आडते, व्यापारी, हमाल यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन परभणी समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण व संचालक मंडळाच्या वतीने केले आहे.