हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मागील चार दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली आहे. ६ नोव्हेंबर रोजी तब्बल २ हजार ९०५ क्विंटलची आवक झाली होती. मोंढ्याच्या टिनशेडमध्ये जागा अपुरी पडल्याने अनेकांचे सोयाबीन रस्त्यावर टाकावे लागले. परिणामी, शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत होती.
दिवाळी तीन दिवसांवर आली आहे. या सणाला बहुतांश व्यापारी, शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार पूर्ण करावे लागतात. या पार्श्वभूमीवर मोंढ्यात गत आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवक दुपटीवर गेली आहे. मागील चार दिवसांपासून सरासरी अडीच हजारांवर सोयाबीनची आवक होत आहे. सोमवारी २ हजार ९०५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. किमान ४ हजार ५२५ ते ४ हजार ९३५ रूपये भाव मिळाला. सध्या मिळणारा भाव समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, दिवाळीत आर्थिक व्यवहार पूर्ण करावे लागत असल्यामुळे मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावी लागत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.पाच हजारांचा टप्पाही गाठेना सोयाबीन
पावसाचा लहरीपणा, येलो मोझॅकचा प्रादुर्भा यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात यंदा कमालीची घट झाली. हलक्या जमिनीत दोन ते तीन क्विटलचा उतारा आला. तर चांगल्या जमिनीतही चार ते पाच क्चिटलवर सोयाबीन गेले नाही. त्यातच बाजारात भावही पडले आहेत. सध्या हिंगोलीच्या मोंढ्यात पाच हजारांचा टप्पाही सोयाबीन गाठत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
शेतकऱ्यांनी आवक वाढत असल्याने मोंढ्याचे शेड अपुरे पडत आहे. त्यामुळे सोयाबीन रस्त्यावर टाकण्याची वेळ येऊ लागली आहे. या सोयाबीनचे नुकसान होते त्याकरिता बाजार समितीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हळदीची आवक मंदावली
सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या येथील संत नामदेव मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. मागील आठवड्यापासून मात्र आवक मंदावली असून, सोमवारी केवळ ६५० क्विटल हळदीची आवक झाली होती. सरासरी ११ हजार ४९० रुपये भाव मिळाला.