राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीनचा हमीभाव ठरवून दिला आहे तरीही बाजारातकापूस आणि सोयाबीन कमी भावात खरेदी केला जात आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळी सणांच्या तोंडावर शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे.
दरम्यान, सरकारने सोयाबीनला 4600, मध्यम धाग्याच्या कापसाला 6640 तर लांब धाग्याच्या कापसाला 7020 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. सध्या बाजार समिती आणि खाजगी अडतदारांकडून सोयाबीन 3800 ते 4500 रुपयांपर्यंत खरेदी केले जात आहे. मालाच्या प्रतवारी नुसार हा भाव दिला जात आहे. नागपूर बाजार समितीमध्ये काल (ता. 12) अवघ्या 3200 रुपये प्रतिक्विंटल भावाने सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे.
शासकीय खरेदी केंद्रावर अजून कापसाची आवक होत नसून खाजगी खरेदीदार शेतकऱ्यांचे घरी जाऊन कापूस खरेदी करतात. कापसामधील ओलाव्याचे कारण सांगून हा कापूस 5000 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल या भावाने खरेदी केला जातो. चांगल्या आणि वाळलेल्या कापसाला ६ हजार ते 6500 पेक्षा जास्त भाव मिळतो.
सध्या शासनाकडून कापूस खरेदी केला जात नसून खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस पाच हजार ते सात हजार रुपये क्विंटल या भावाने खरेदी केला जातोय. सोयाबीन मध्ये सुद्धा नंतर पडलेला पावसामुळे आणि पिवळा मोझ्याक च्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे दाणे परिपक्व झाले नाही. त्यामुळे ए वन माल बाजारात येत नाही. ए वन मालाला चांगला भाव मिळत आहे.
- नितीन विखे, सचिव (कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण)
शासनाने दिलेला हमीभाव चांगल्या आणि पूर्णपणे वाळलेल्या सोयाबीन साठी आम्ही देतो. सध्या बाजारात येणारा माल हा ओलसर असतो तो माल घेतल्यानंतर आम्हाला वाळायला टाकायला लागतो. म्हणून सध्या 3800 ते 4500 रुपये प्रतीक्विंटल पर्यंत प्रतवारीनुसार आम्ही सोयाबीनला भाव देत आहोत.
- परमेश्वर पाटोळे, अडतदार (कृषी उत्पन्न बाजार समिती अंबड, जि. जालना)
काल दिनांक १२ ऑक्टोबरचे सोयाबीनचे सरासरी भाव (प्रतिक्विंटल)
कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम - 4345 रु.
कृषी उत्पन्न बाजार समिती, मानोरा, ता. वाशिम -4402रु.
कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली - 4200रु.
कृषी उत्पन्न बाजार समिती, यवतमाळ -4366रू.
शेतकरी कृषी बाजार - 4366रु.