Join us

कर्नाटकी कांद्याच्या निर्यात शुल्कावर सवलत का दिली आहे ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 9:25 AM

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील बाजार समित्यातील व्यापाऱ्यांनी आणि राज्यभरातील शेतकऱ्यांनी बाजार समिती बंद ठेवून या निर्णयाचा विरोध केला. पण केंद्र सरकारने कर्नाटकातील कांद्याच्या एका वाणाच्या निर्यातीवरील निर्यात शुल्कावर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यामुळे देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी सरकारवर नाराज झाले होते. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील बाजार समित्यातील व्यापाऱ्यांनी आणि राज्यभरातील शेतकऱ्यांनी बाजार समिती बंद ठेवून या निर्णयाचा विरोध केला. पण केंद्र सरकारने कर्नाटकातील कांद्याच्या एका वाणाच्या निर्यातीवरील निर्यात शुल्कावर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यावर अन्याय झाल्याचा सूर निघत आहे.

कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर 'बंगळुरू गुलाबी कांद्या'ची लागवड केली जाते. या कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्कात सवलत दिली आहे. दरम्यान, ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याच्या आधीच्या अधिसूचनेत सर्व प्रकारच्या कांद्याचा सामावेश होता. मात्र, केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील नव्याने अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी काढून बंगळुरू गुलाबी कांद्याच्या निर्यात शुल्कावर सवलत दिली आहे.

पण निर्यात शुल्कावरील सवलतीसाठी कर्नाटकातील फलोत्पादन विभागाच्या आयुक्तांचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. संपूर्ण देशातील कांद्याच्या निर्यातीवर शुल्क लागू आहे पण कर्नाटकातील एका वाणाच्या निर्यात शुल्कात सवलत दिल्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. इतर वाणांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या गुलाबी कांद्याचं वैशिष्ट्ये काय?बंगळुरू गुलाबी कांदा हा गडद गुलाबी रंगाचा असून या वाणाला २०१५ मध्ये भौगोलिकदृष्ट्या 'जीआय' मानांकन मिळालं आहे. लोणचे, सांबर बनवण्यासाठी या कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. कर्नाटकातील बंगळुरू, कोलार, चिक्कबल्लापूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबी कांद्याची लागवड केली जाते तर हसन, तुमकूर, धारवाड, दावणगिरी आणि बागलकोट या भागातही या कांद्याची लागवड काही प्रमाणात केली जाते.

या कांद्याच्या निर्यात शुल्कात सवलत का?हा कांदा निर्यातीसाठी योग्य असून या कांद्याची चव इतर कांद्याच्या तुलनेत जास्त तिखट असते. भारतात हा कांदा जास्त खाल्ला जात नाही तर या कांद्याची टिकवण क्षमता सुद्धा कमी असते. म्हणून या कांद्याच्या वाणाच्या निर्यात शुल्कावर सवलत दिल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, हाँगकाँग, बांगलादेश, श्रीलंका आणि अरब राष्ट्रांत या कांद्याची निर्यात होते.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डनाशिकशेतकरीकर्नाटकपेरणीशेती