अपुऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात झालेली लागवड, पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या लागवडीसाठी वी म्हणून वापर करावा लागत असल्याने मागील पंधरा दिवसांपासून बाजारात मागणीनुसार लसूण उपलब्ध होत नाही.
त्यामुळे एरव्ही शंभर ते दीडशे रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या लसणाचा दर प्रतिकिलो ३२० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
गतवर्षीचे खराब हवामान व कमी पाऊस यामुळे महाराष्ट्रासह लसणाचे मोठे उत्पन्न घेत असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांतील लसणाचे उत्पादन घटले होते.
त्यातच इतर पिकांप्रमाणे लसणालाही यंदाच्या तीव्र उन्हाचा फटका बसल्याने मागणीच्या प्रमाणात पुरवठा झाला नाही.
परिणामी, लसणाचे भाव वाढले होते. लसणाची लागवड वर्षातून एकदाच ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीत केली जाते. बी म्हणून लसूणच वापरला जातो. एक एकरातील लागवडीसाठी साधारणतः दीडशे किलो लसूण लागतो.
तरकारीची पिके तीन महिन्यांच्या कालावधीत विक्री योग्य होतात. लसूण मात्र लागवडीनंतर सुमारे पाच महिन्यांनी विक्रीसाठी तयार होतो तरकारीच्या हिशेबात लसूण अधिकचे दोन महिने घेत असल्याने लगोलग तरकारीचे दुसरे पीक घ्यायला संधी मिळत नाही व नफाही लांबतो.
त्यामुळे बरेच शेतकरी लसणाचे पीक एकरावर न घेता वाफ्यावर अथवा गुंठ्यावर घेतात. पुढील दोन महिन्यांत लागवड झालेला लसूण बाजारात यायला किमान पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने लसणाच्या वाढत्या दराची झळ लोकांना सोसावी लागणार आहे.
त्यामुळे राज्यात उत्पादन कमी■ उत्तम नियोजन केल्यास एक एकर क्षेत्रात लसणाचे चार टन उत्पादन मिळू शकते, एक एकरासाठी १५० किलो लसूण लागतो. त्यासाठी ५० हजार रुपये खर्च येतो. ३५ हजार रुपयांचे शेणखत लागते, १० हजार रुपये इतर खतांसाठी लागतात, १५ हजार रुपये मशागतीसाठी लागतात, एक हजार रुपये लागवडीसाठी लागतात.■ किलोला सरासरी १०० रुपये दर मिळाला तरी उत्पादनाचा १ लाख ५० रुपये खर्च वजा जाता २ लाख ५० हजार रुपये निव्वळ नफा होतो. मात्र, लागवड केल्यानंतर पाच महिन्यांनी लसूण विक्रीसाठी येतो. इतर तरकारी पिकांच्या तुलनेत दोन महिन्यांचा अधिकचा हा कालावधी असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर लसणाचे उत्पादन घेत नाहीत.