चाकण येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. यामुळे कांदा साठवणूक ठेवणाऱ्या उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. चाकण बाजारामध्ये बुधवारी (ता. ३०) दोन हजार कांदा पिशव्यांची म्हणजे १ हजार क्विंटलची आवक झाली. प्रतवारीनुसार त्यास प्रतिक्विंटलला पंधराशे ते आठराशे रुपये भाव मिळाला. यामुळे उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे.
कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी तसेच देशाअंतर्गत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने कांद्यावर ४०% निर्यात शुल्क आकारले आहे. मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींमुळे अनेक शेतकरी लखपती झाले. येत्या काळात कांद्यामध्ये दरवाढ होण्याचे संकेत असल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र शुल्क लादण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
देशाअंतर्गत कांदा वाढणारकेंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर आता ४०% शुल्क आकारले आहे. जगातील कांद्याचा मोठा निर्यातदार असणाऱ्या भारतातील शेतकयांना कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकायचा असेल तर त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. परिणामी, देशाअंतर्गत कांद्याची उपलब्धता वाढेल. हा साठा वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण होईल. कांदा उत्पादक शेतकन्यांना यामुळे फटका बसत आहे.
निर्यात शुल्क वाढल्याने काय होईल?२०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत भारतातील कांद्याची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत ६३ टक्क्यांनी वाढली. १.४६ दशलक्ष मेट्रिक टन एवढी निर्यात झाली आहे. निर्यातीवरील शुल्क ४० टक्क्यांनी वाढवल्याने भारतातील कांदा चीन, पाकिस्तान, इजिप्त या देशांमध्ये अधिक महाग होईल.
कुठे निर्यात होतो कांदा?जगातील कांदा पुरवठ्याचा भारत मोठा निर्यातदार आहे. आशियाई देशांमधील अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पाकिस्तानातील बिर्याणी तसेच मलेशियातील बेलाकन अशा पदार्थांसह बांगलादेशातील फिश करीसाठी कांद्याची मागणी आहे. बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका या देशांना भारत निर्यात करतो.
कांद्याचे दर क्विटलला २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांवर पोहोचले होते. कांद्यावर निर्यात शुल्क लागू करताच हे दर आता १ हजार ५०० ते २ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. बाजाराची मानसिकता बदलली असून, निर्यातदारांनी कांदा खरेदीस हात आखडता घेतल्याने घसरण झाली. - विक्रम शिंदे, कांदा बटाटा व्यावसायिक, चाकण मार्केट
सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांदा उत्पादक, व्यापारी आणि बाजार समितीसुद्धा संभ्रमावस्था अवस्थेत आहे. एक नंबरच्या कांद्याला दोन हजार चारशे रुपयांनी खरेदी करणार आहेत पण बाकीच्या कांद्याला काय भाव देणार ? नाफेडकडून ही खरेदी केली जाणार आहे. मग पुणे जिल्ह्यासह चाकण बाजारातील कांदा खरेदी कधी सुरु करणार आहे? - कैलास लिंभोरे पाटील, सभापती, बाजार समिती, खेड तालुका
कांद्यांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे शेतकरी नाराज आहेत. - साहेबराव पवार, कांदा उत्पादक शेतकरी.