विठ्ठल खेळगी
सोलापूर : सोलापूर बाजार समितीतून दररोजी ५ ते १० ट्रक कांदाबांगलादेशला पाठविण्यात येते. बांगलादेशमधील हिंसाचारामुळे सोलापुरातील कांदा मार्केटावर फारसा परिणाम झालेला नाही.
मात्र, सीमेवर थांबलेल्या गाड्यामधील माल खराब होणार आहे. नाशिकमधून जास्त माल जातो. त्या प्रमाणात सोलापुरातून माल जात नाही. त्यामुळे कांदा मार्केटमधील आवक आणि दरही स्थिर आहे.
बांगलादेशमध्ये भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात थांबली आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करत असल्याने या घडामोडींनी दोन्ही देशांचे नकसान होणार आहे.
नाशिकमधून दररोज कांद्याचे ७० ते ८० ट्रक बांगलादेशला रवाना होतात. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. सोलापुरातून ही दररोज ५ ते १० गाड्या बांगलादेशला जातात.
मागील दोन दिवसांपासून ते बंद आहे. मात्र, त्यापूर्वी पाठविलेल्या गाड्या सीमेवर थांबून असल्याचे सांगण्यात आले. एका ट्रकमध्ये ३० टन कांदा भरला जातो. मात्र, कांद्याची वाहतूक थांबली असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले.
मागील आठवड्यात बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत. हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची नामुष्की ओढवू शकते. त्यामुळे दर कमी मिळणार आहे.
मार्केट सुरळीतपणे सुरू
बांगलादेश हिंसाचाराचा कांदा मार्केटवर सध्या तरी परिणाम झालेला नाही. आवकही नेहमीप्रमाणे १२५ ते १५० ट्रक आवक आहे. दरही २५०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल आहे. त्यामुळे मार्केट सुरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती कांदा विभागाचे शेजाळ यांनी सांगितले.
सोलापुरातून कांदा बांगलादेशच्या सीमेवर जाण्यासाठी चार दिवस आणि चार रात्र लागतात. त्यामुळे वेळीच गाड्या रिकाम्या न झाल्यास माल खराब होतो. त्यात सध्या सीमेवर गाड्या थांबून आहेत. त्यामुळे खराब झालेला माल टाकून दिल्याशिवाय पर्याय नाही. - केदार उंबरजे, कांदा व्यापारी, सोलापूर