नैसर्गिक संकटे पाठ सोडत नसल्यामुळे पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट होत आहे. तर दुसरीकडे बाजारात शेतीमालाला मिळणारे भावही बेभरशाचे झाले आहेत. हिंगोलीच्या मोंढ्यात ३ ऑक्टोबर रोजी १३ हजार रुपये प्रतिक्विंटलने विक्री झालेल्या मुगाच्या भावात सात दिवसांत सहा हजारांनी घसरण झाली असून, १० ऑक्टोबर रोजी जास्तीतजास्त ७ हजार रुपयाने मुगाची विक्री झाली. आठवड्यात शेतीमालांचे पडणारे भाव लक्षात घेतल्यास जगावं तरी कसं? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा खरिपाच्या प्रारंभी वीस दिवसांवर पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या. पेरणीविना मृग निघून गेल्याने मूग, उडदाचा पेरा घटला. त्यातच मध्यंतरीही पावसाने दडी मारल्याने पिकांना फटका बसला. त्यामुळे मूग, उडदाचे उत्पादन निम्म्याखाली आले. त्यामुळे यंदा मुगाला १४ ते १५ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, हिंगोलीच्या मोंढ्यात आठवड्यापूर्वी नव्या मुगाला १० हजारांपर्यंत भाव मिळला. दरात वाढ होऊन ३ ऑक्टोबरला १३ हजार रुपये क्विंटलने विक्री झाली.
यंदा पावसाने साथ दिली नसल्याने खरीप हंगाम कायम संकटात राहिला. त्यामुळे मूग, उडदासह सोयाबीनचे उत्पादनातही प्रचंड घटले आहे. त्यातच भावही समाधानकारक मिळत नसल्याने लागवडही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावे तरी काय? हेच कळत नाही. - काशिराम कऱ्हाळे, शेतकरी
यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा असताना घसरण होऊन १० ऑक्टोबरला २५ क्विंटल मूग विक्रीसाठी आला होता. ५ हजार ९०० ते ७ हजार रुपये क्विंटलने शेतकऱ्यांन विक्री करावी लागली. सात दिवसांत तब्बल सहा हजाराने मूग घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन, उडीद, तुरीचे भाव स्थिर...'
येथील मोंढ्यात नवे सोयाबीन, उडीद विक्रीसाठी येत आहे. या दोन्ही शेतमालांचे भाव सध्या तरी स्थिर आहेत. मंगळवारी १३ क्विटल उडीद विक्रीसाठी आला होता. ७ हजार १०० ते ८ हजार रुपये भाव मिळाला. तर ६०० क्विटल सोयाबीनची आवक झाली होती. ४ हजार २०० ते ४ हजार ५६५ रुपये भाव मिळाला. सध्या शेतमालाचे दर स्थिर आहेत. परंतु, शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा आहे.हळदीच्या दरात घसरण येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात ऑगस्टमध्ये १७ हजारांवर पोहोचलेल्या हळदीच्या दरात घसरण झाली असून, १० ऑक्टोबर रोजी जास्तीत जास्त १२ हजार ६०० रुपये भाव मिळाला. भाव उतरल्यामुळे आवकही कमी होत आहे.