पुणे : दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी बाजारात झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा मात्र मार्केट यार्डात गुरुवारी झेंडू फुलांची आवक १०० ते १२० टन झाली असून घाऊक बाजारात १०० ते १५० रुपये भाव आहे.
विक्रीसाठी आलेल्या फुलांपैकी ७० टक्के फुलांचा दर्जा खालावला आहे. मात्र, मागणी वाढत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेंडू फुलांना दुप्पट भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात १०० ते १५० रुपयांचा दर मिळत आहे.
दरवर्षी लक्ष्मी पूजनासाठी शेतकरी फुले राखून ठेवतात. मात्र, यंदा परतीचा पाऊस लांबल्याचा फटका फुलांना बसला आहे. ६० टक्के खराच मालाचे प्रमाण बाजारात होते. त्यात चांगल्या प्रतीच्या फुलांना चांगला भाव मिळत आहे. यंदा मात्र फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.
येथून होते आवक मार्केटयार्डातील फूलबाजारात पुणे, सातारा, धाराशिव, हिंगोली, मोहोळ या भागांतून फुलांची आवक झाली आहे. लक्ष्मी पूजनासाठी झेंडूच्या फुलांसह कापरी, शेवंती, ऑस्टर, गुलछडी या फुलांना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.
यंदा या फुलांचे उत्पादन घटले आहे. ग्राहक, विक्रेत्यांकडून फुलांना चांगली मागणी असल्याने दर वधारले आहेत. बाजारात दिवाळीमुळे फुलांना मागणी कायम राहिली आहे. यंदा चांगला दर मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. - सागर भोसले, व्यापारी
शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या फुलांवर धुक्याचा परिणाम होत आहे. धुके आणि दव पडत असल्याने फुले ओली राहत आहेत. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांना चांगला भाव मिळाला आहे. यंदा फुलांमुळे बळाराजाला लक्ष्मी पावली आहे. - रोहित मोरे, शेतकरी, वाई (जि. सातारा)
यंदा फुलांची आवक चांगली होती. फुल उत्पादक शेतकरी भाव चांगला मिळत आहे. मात्र यंदा चांगल्या मालाची ४० आवक असून ६० माल खराब आला आहे. त्यामुळे झेंडू फूल प्रतिकिलो शेभर रुपयांचा दर मिळाला आहे. - अरुण वीर अध्यक्ष, अखिल पुणे फूल बाजार आडते असोसिएशन