Join us

Zendu Bajar Bhav : दिवाळीच्या तोंडावर बाजारात झेंडूच्या फुलांचा तुटवडा.. कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 9:46 AM

दीपोत्सवानिमित्ताने बाजारात मोठी उलाढाल होत आहे. यात लक्ष्मीपूजनानिमित्ताने झेंडूंच्या फुलांची मागणी अधिक वाढली आहे. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे.

सोलापूर : दीपोत्सवानिमित्ताने बाजारात मोठी उलाढाल होत आहे. यात लक्ष्मीपूजनानिमित्ताने झेंडूंच्या फुलांची मागणी अधिक वाढली आहे. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे.

परिणामी, झेंडूच्या फुलांचे दर गेल्या काही दिवसांपासून चढेच असून, किरकोळ बाजारात किमान ८० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले.

दिवाळी सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्या सणाला झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. पूजेसह घराला तोरण बांधणे, सजावट, वाहनांना तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात.

दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन व वाहनांच्या पूजेसाठी झेंडू फुलांची मागणी वाढली असून, झेंडू फुलांच्या दुकानांनी बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच शेतात लागवड केलेले शेतकरी बांधव झेंडू फुले विक्री करण्यासाठी थेट बाजारात दाखल झालेले दिसून येत आहेत.

गजऱ्यासाठी काकडा फुलांना मागणीसण उत्सवादरम्यान महिला वर्गाकडून गजऱ्याची मागणी अधिक असून, गजऱ्यासाठी लागणारा काकडा फूल १२० ते १५० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. साधारण एक किलो काकडा फुलामध्ये १५ गजरे तयार होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

येथून होतेय आवककृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दरवर्षी जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, दक्षिणी सोलापूर तसेच अन्य भागातून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. तसेच शेजारील धाराशिव, लातूर आणि गुलबर्गा आदी भागांतूनही फुलांची मोठी आवक होते.

असे आहेत दर (किलो)■ झेंडू ८०-९०■ शेवंती १५०-२००■ गुलाब १५०-२००■ बटन गुलाब ३२०-३५०■ गुलछडी १२०-१५०■ काकडा १२०-१५०

अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे. सध्या बाजारात मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. परिणामी दर वाढलेले आहेत. लक्ष्मीपूजन दिवशी आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. - श्रीशैल घुली, फूल विक्रेते

टॅग्स :फुलंफुलशेतीबाजारमार्केट यार्डसोलापूरशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती