कऱ्हाड ते सांगलीपर्यंत कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबरपासून कोयना धरणातून दोन हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांत पाणीसांगलीत येणार असून, पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मुदत झाली आहे.
पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदी ऑक्टोबर महिन्यातच कोरडी पडली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला होता. प्रशासनाच्या चुकीमुळे कृष्णा काठच्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. या गंभीर प्रश्नावर आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारीच आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कोयना धरणातून शुक्रवारी दुपारपासून कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन युनिट सुरू केली आहेत. या दोन युनिटमधून दोन हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे कृष्णा नदी प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. धरणातून सोडलेले पाणी सांगलीत येण्यासाठी दोन दिवस लागतील, असा प्रशासनाचे मत आहे. दोन दिवसांनंतर कृष्णा नदीकाठच्या गावासह परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
कोयना धरणातून दुपारपासून दोन हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडला आहे. यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी दीड ते दोन दिवस लागणार आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कोयनेतून विसर्ग वाढविला आहे. यामुळे नदीकाठासह जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. - ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे मंडळ
दोन दिवस दूषित पाणीपुरवठा
कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांना दोन दिवस दूषित पाणी पुरवठाच होणार आहे. नागरिकांनी दुषित पाण्याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.
'लोकमत'च्या दणक्याने प्रशासनाला जाग
'लोकमत मध्ये जिल्हा पाणीटंचाईत होरपळताना पालकमंत्री राज्याच्या दौऱ्यावर अशी बातमी प्रसिद्ध झाली. त्यापूर्वीही कृष्णा नदी कोरडी पडण्यास आणि लोकप्रतिनिधीतील सावळागोंधळ कसा जबाबदार आहे, या प्रश्नावर आवाज उठविला होता. यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे हे तत्काळ राज्याचा दौरा रद्द करून सांगलीत दाखल झाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी संपर्क साधून कोयनेतून पाणी सोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शुक्रवारी दुपारपासून कोयना धरणातून पाणी सोडले. याबद्दल शेतकरी, पाणीपुरवठा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत चे आभार मानले.
आंदोलनानंतर नेते झाले जागे
पाणीटंचाईनंतर शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारी शेतकरी रस्त्यावर उतरताच जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क करून कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत विनंती केली. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही प्रशासनाची बैठक घेऊन तातडीने पाणी सोडण्याबाबत अधिकायांना सूचना दिल्या. शुक्रवारी दुपारी साडेचारपासून दोन हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.