शिराळा : शिराळा तालुक्यात तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. धरण क्षेत्रातील पाथरपुंज येथे रविवारी सकाळी सात ते सोमवार सकाळी सात या चोवीस तासात २३३ मि. मी. तर एकूण ६२०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
आजअखेर चांदोलीत तीन हजार मि. मी. तर पाथरपुंजला सहा हजार मि. मी. पाऊस झाला आहे. सोमवारी पाथरपुंज येथे सकाळी सात ते सायंकाळी पाच या दहा तासात २४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आता चांदोलीत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे व वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग बंद केला आहे.
चांदोली धरणात एकूण ३०.३७ टीएमसी म्हणजेच ८८.२६ टक्के साठा आहे. उपयुक्त २३.४९ टीएमसी साठा आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे नदीकाठच्या शेतात पाणी साचल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.
ऊस, भुईमूग, सोयाबीन आदी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
६ हजार शेतकऱ्यांना फटका तालुक्यात अतिवृष्टीमुळे ३० गावातील एकूण २१५४ हेक्टरपैकी भाताचे ३९० हेक्टर, ऊस १६१९ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले आहे. ६२३८ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
चांदोली क्षेत्रातील पाऊस
पाथरपुंज ४७९ (६४५७)
निवळे ० (४९३८)
धनगरवाडा १ (३०२६)
चांदोली धरण ५ (३०३०)