फुलंब्री तालुक्यातील गिरीजा-वाकोद मध्यम प्रकल्पाच्या जोड कालव्यासाठी शनिवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २७५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात तीन मध्यम प्रकल्प आहेत. यातील वाकोद मध्यम प्रकल्पाला पाणी साठवण्यासाठी फारसा सोर्स नाही. या धरणात पाणी कसे पाठवयाचे, म्हणून गिरीजा नदीचे पाणी वळविणे हा एकच मार्ग होता. त्यामुळे राज्य शासनाकडे गिरीजा- वाकोद जोड कालव्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला जलसंपदा विभागाने मंजुरी दिली होती; पण निधीची तरतूद केली नव्हती. या प्रकल्पाला शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
किलोमीटरवरून ९ किला घरात पाणी
फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील गिरीजा नदीवर दोन्ही बाजूने भिंती बनविल्या जाणार असून नदी पात्रात पाणी अडवून ते पाईप लाईनच्या माध्यमातून वाकोद मध्यम प्रकल्पात सोडले जाणार आहे. बांधलेल्या भिंतीच्या वरुन पाणी वाहू लागले तर ते पाणी नदीच्या पत्रातून खाली जाईल. पाईप लाईनद्वारे पाणी पाठविले जाणार असल्याने जमीन संपादन करण्याची गरज राहणार नाही. ही पाईप लाईन ९ किलोमीटर लांबीची राहणार आहे.
मराठवाड्यात पहिला प्रकल्प
गिरीजा नदीचे वाहून जाणारे पाणी अडवून ते पाईप लाईनच्या माध्यमातून प्रकल्पात सोडण्याचा हा मराठवाड्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे या भागातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
वाकोद धरणात गिरीजा नदीच्या पुराच्या पाण्यातून योजनेसाठी पाणी सोडण्याचा इरादा करून शासनाला प्रस्ताव पाठविला होता. यासाठी गेल्या ४ वर्षांपासून पाठपुरावा केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत २७५ कोटी रुपयांची तरतूद मंजूर झाली आहे. हा शेतीसाठी लाभदायी ठरणारा प्रकल्प आहे. -हरिभाऊ बागडे, आमदार