सिन्नर : हक्काचे भोजापूरचे पूरपाणी त्याचबरोबर निळवंडे धरणातील पाणी मिळावे, यासाठी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी सोमवार (दि.७) ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्गावर आंदोलन करणार आहेत.
अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने निळवंडेचे पाणी दुसरीकडे वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. देवनदीचे पाणी देखील नगर जिल्ह्याकडे वळवले आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सोमवार रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
भोजापूर पूरपाणी सिन्नरच्या पूर्व भागातील दुशिंगपूर येथील साठवण बंधाऱ्यासाठी प्राधान्याने सोडणे अपेक्षित असताना हक्काचे पाणी द्यायला अधिकाऱ्यांची नेहमीच टाळाटाळ असते. यंदाच्या हंगामात मनमानी करून अधिकाऱ्यांनी पूरपाणी महिनाभर दुसरीकडे घालवले. दुशिंगपूरच्या नावाखाली सोडवण्यात आलेल्या पाण्याचा एक थेंब देखील अद्याप साठवण बंधाऱ्यात आला नाही.
उपलब्धता असतानाही पाणी देण्यास टाळाटाळ...
■ वास्तविक दुशिंगपूरमध्ये पाणी आल्यावर निहाळे, फत्तेपूर, फुलेनगर, घोटेवाडी, कहांडळवाडी, दुशिंगपूर या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. त्याचबरोबर सिन्नर तालुक्यातील काहंडळवाडी, दुसिंगपूर, मलडोन, सायाळे, वारेगाव, पाथरे ही सहा गावे, संगमनेर तालुक्यातील तळेगाव, चिचोली, देवकौठे आणि कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ही गावे निळवंडेच्या लाभक्षेत्रात येतात.
■ निळवंडे कालव्याला आवर्तन सुरू असताना सलग दुसऱ्या वर्षी पाणी देण्यास प्रशासकीय यंत्रणा टाळाटाळ करत असल्याचा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.
■ भोजापूर आणि निळवंडे प्रकल्पाचे हक्काचे पाणी लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकाला असलेल्या गावांपर्यंत मिळाले पाहिजे.
■ यापूर्वी देखील प्रत्येक वेळी पाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. यंदा देखील रस्त्यावर उतरण्याची तयारी पूर्वेकडील गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
■ सोमवारी सकाळी ११ वाजल्यानंतर भोजापूर व निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर उपोषण आंदोलन सुरू करतील असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी प्रशासनास दिला आहे.