करमाळा : शेती हे एकट्याने करण्याचे क्षेत्र नाही तर सर्व शेतकऱ्यांनी संघटित मिळून करण्याचे क्षेत्र आहे याची जाणीव दिवसेंदिवस वाढत आहे.
शेलगाव (क) कृषी क्रांती शेतकरी गटाने राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या मदतीने सह्याद्री फार्मर कंपनी नाशिक यांच्याबरोबर स्वीट कॉर्न मक्याचा करार करून ३ दिवसांत ३० टन मका पाठवला.
या मक्याला बाजारभावापेक्षा सरासरी दुप्पट भाव मिळाला. सामूहिक शेती केल्याने खर्चही कमी झाला आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले त्यामुळे करार शेतीचा राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचा प्रयोग यशस्वी झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या शेलगाव क कृषी क्रांती शेतकरी गटातील सर्व सदस्यांनी स्वीट कॉर्न मका हे दुसरे पीक निवडले.
७० दिवसांत ७० हजार हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वीट कॉर्न मक्याची लागवड जुलै २०२४ मध्ये केली. २० सप्टेंबरनंतर स्वीट कॉर्न
मक्याचे हार्वेस्टिंग झाले.
बाजारामध्ये ६ ते ७ रुपये प्रति किलो हा दर असताना सह्याद्री फार्मर कंपनीने प्रत्यक्षात १३ रुपये प्रति किलो दर दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळाले.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ११ रुपये प्रति किलो दराने करार ठरलेला असूनही प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक दर सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने दिल्यामुळे करमाळा तालुक्यातील इतर अनेक शेतकऱ्यांना स्वीट कॉर्न मक्याची लागवड करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
खरीप हंगामात १५ एकर क्षेत्रावर केलेला स्वीट कॉर्न मक्याचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आमच्या शेतकरी गटाबरोबरच गावातील इतर शेतकयांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्यामुळे रब्बी हंगामात आमच्या शेलगाव (क) गावामध्ये किमान ५० एकर मक्याची लागवड होईल असा विश्वास आहे. - गणेश माने, शेलगाव (क) ता. करमाळा कृषी क्रांती शेतकरी गट