चंदगड : गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून हत्तींचा मानवी वस्ती व हद्दीत वाढलेला वावर रोखण्यासाठी त्यांच्या आवडीचे खाद्य जंगलातच तयार करणे गरजेचे आहे, असे मत हत्ती अभ्यासक आनंद शिंदे यांनी व्यक्त केले.
हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्याच्या हेतूने 'ट्रक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन'तर्फे वर्षभर चंदगड व आजरा तालुक्यांत विविध कामांची त्यांनी माहिती दिली.
शिंदे म्हणाले, हत्तीचा वावर असलेल्या चंदगड व आजरा तालुक्यांतील विविध गावांत जाऊन प्रबोधन केले. २६ शाळा, २२ गावांतून विद्यार्थी व नागरिकांना हत्तींचे पर्यावरणीय महत्त्व सांगितले. हत्तींकडून नुकसान होऊ नये म्हणून माणसांकडून अपेक्षित वर्तन याबाबत माहिती दिली.
जंगलातील खाद्य कमी झाल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येत आहेत. आंबा, फणस, काजू, बेडले माड, बेल, वड, पिंपळ, बांबू, केळी, हत्ती गवत या वनस्पती हत्तींसह इतर प्राण्यांचेही आवडते खाद्य आहे. गतवर्षी जांबरे, नगरगाव, रायवाडा, पार्ले, हाजगोळी, पिळणी, भोगोली येथे वन विभागाच्या सहकार्याने जंगलात ६६ हजारहून ही झाडे लावली.
मलकापूर येथील नर्सरीतून पाच वर्षे पूर्ण झालेली रोपे आणून लावल्यामुळे ती चांगल्या प्रकारे जगली आहेत. या वर्षीसुद्धा जंगलातील विविध भागात वृक्ष लागवड केली जाणार आहे. जूनच्या सुरुवातीला नरगट्टे (ता. चंदगड) व जेऊर (ता. आजरा) येथे झाडे लावण्यात येणार आहेत.
विविध गावांसह मार्गावर हत्तींचा वावर
चंदगड व आजरा तालुक्यांतील जाबरे, पिळणी, जेलुगडे, कलिवडे, किटवडे, खानापूर व करपेवाडी या परिसरात सध्या हत्तींचा वरचेवर वावर असून, हाजगोळी तुडीये, जंगमहट्टी-पार्ले, जांबरे-उमगाव, पिळणी-भोगोली, देवार्डे-सुळेरान, खानापूर-सोहाळे, देऊळवाडी या मार्गावर हत्तींचे दर्शन होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार्य करण्याचे आवाहन
आमच्या संस्थेकडून शेतकऱ्यांच्या हिताचेच काम केले जात आहे. त्यासाठी हत्तींचा अभ्यास करत त्यापासून हत्ती व शेतकरी यांच्यातील संघर्ष नक्की कमी करू, त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिदे यांनी केले आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश