कर्नाटकातील अलमट्टी धरणामध्ये सोमवारी ९१.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ७४ टक्के भरले आहे. पण, दक्षिण महाराष्ट्रातील धरणांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
सातारा, सांगली जिल्ह्याची तहान भागविणारे कोयना धरण केवळ ३९.३३ टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर धरण भरणार की नाही, याची चिंता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील आठवडाभर संततधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
दक्षिण महाराष्ट्रातून जाणारे सर्व पाणी अलमट्टी धरणात साठविले जात आहे. अलमट्टी धरणाची क्षमता १२३ टीएमसी असून सध्या ९१.६६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ७४ टक्के धरण भरले आहे. अलमट्टी धरणात २५ हजार १२३ क्युसेक्स पाण्याची आवक असून, धरणातून १५ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.
कोयना धरण सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांची तहान भागविते. या धरणाची १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असून, ४१.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ३९.३३ टक्के भरले आहे.
वारणा धरणाची ३४.४० टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. या धरणात सध्या १९.९० टीएमसी पाणीसाठा असून, धरण ५८ टक्के भरले आहे. हे धरण ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील तारळी धरण ३९ टक्के, उरमोडीत २५ टक्के, थोम-बलकवडी धरणात सर्वात कमी २३ टक्के पाणीसाठा आहे.
धोम ३६ टक्के तर कण्हेर ३८ टक्के भरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा ४२ टक्के तर राधानगरी धरण ५५ टक्के भरले आहे. राधानगरी, वारणा, तुळशी, कासारी या धरणातच ५५ ते ५९ टक्केपर्यंत पाणीसाठा असून, उर्वरित सर्वच धरणांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
धरणांची स्थिती (पाणीसाठा टीएमसीमध्ये)
धरण | आजचा साठा | क्षमता | टक्के |
कोयना | ४१.४० | १०५.२५ | ३९.३३ |
धोम | ४.९१ | १३.५० | ३६ |
कण्हेर | ३.८५ | १०.१० | ३८ |
वारणा | १९.९० | ३४.४० | ५८ |
दूधगंगा | १०.५६ | २५.४० | ४२ |
राधानगरी | ४.५९ | ८.३६ | ५५ |
तुळशी | १.९२ | ३.४७ | ५५ |
कासारी | १.६५ | २.७७ | ५९ |
धोम-बलकवडी | ०.९२ | ४.०८ | २३ |
उरमोडी | २.४७ | ९.९७ | २५ |
तारळी | २.२७ | ५.८५ | ३९ |
अलमट्टी | ९१.६६ | १२३ | ७४ |
अधिक वाचा: Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस, उजनी धरणाच्या पाण्यात झपाट्याने वाढ