कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी धरणात ७२ हजार २८६ क्युसेकने पाणी जमा होत आहे. धरणामध्ये ९९.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून ८१ टक्के धरण भरले आहे.
धरणातून सध्या ६५ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. चांदोली (वारणा) धरणात ६२ टक्के, तर कोयना धरणात ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत सलग आठ दिवस जोरदार पाऊस पडेल, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तविला आहे.
त्यानुसार सध्या चांदोली (वारणा), कोयना धरण क्षेत्रासह सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील शेतकरी आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांचे अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
अलमट्टी धरणाची क्षमता १२३.०८ टीएमसी पाणीसाठ्याची आहे. गुरुवारी दुपारी या धरणामध्ये ९९.३२ टीएमसी पाणीसाठा होता. म्हणजेच दर जवळपास ८१ टक्के भरले आहे. धरणामध्ये सध्या ७२ हजार २८६ क्यसेकने पाण्याची आवक होत आहे.
त्यामुळे कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने धरणातून ६५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. चांदोली (वारणा) धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे सध्या कालवा व विद्युतगृहाद्वारे वारणा धरणातून एक हजार ६४९ क्युसेकने विसर्ग सरू आहे.
अधिक वाचा: Maharashtra Weather Update: केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा, या जिल्ह्यांत पावसाचा दणका