कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातील रबीची पीक धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार टेंभू योजना सुरू करण्यासाठी कोयना धरणातून मंगळवारी सकाळी ११ वाजलेपासून एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. बुधवारी सकाळी टेंभू योजनेचे विद्युत पंप सुरू करून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे, असे टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी नसल्यामुळे कोयना धरणातून २२ डिसेंबरपासून विसर्ग बंद केला होता. परिणामी, टेंभू योजना सुरू करण्यात अडचणी येणार आहेत, याबद्दल 'लोकमत'ने दि. २६ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोयना धरण व्यवस्थापनाकडे पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानुसार कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू केले आहे. येथून कोयना नदीपात्रामध्ये एक हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.