बालेखान डांगे
चरण : काळुंद्रे (ता. शिराळा) येथील शेतकरी रामराव पाटील यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत बांबू लागवड केली. यात पर्यावरण रक्षणासह लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड आहे.
मुंबईमध्ये पस्तीस वर्षे व्यवसाय केल्यानंतर गावी येऊन शेतीत नवनवीन प्रयोग करणारे काळुंद्रे गावचे रामराव पाटील हे बांबूशेती फुलवणारे पश्चिम भागातील एकमेव शेतकरी आहेत. शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी गावात आल्यानंतर शेती करण्यास सुरुवात केली.
पारंपरिक ऊस व भात पिकात त्यांना फारसा नफा मिळत नसल्याचे दिसून आले. मुंबईत व्यवसाय केल्यामुळे नफा तोट्याचे गणित त्यांना चांगलेच ठाऊक होते. यातूनच त्यांनी नवीन पिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
त्यांना बांबू पिकाबद्दलची माहिती मिळाली. आजरा, बीड, इचलकरंजी या ठिकाणच्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बांबू लागवडीची माहिती घेतली. कऱ्हाडचे हनुमंत हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली मे २०२२ मध्ये बांबू लागवड केली.
बांबू एक वेळा लागवड केल्यानंतर ५० वर्षे वर्षे उत्पन्न मिळते. पहिली तीन वर्षे बांबूचे उत्पादन मिळत नाही. लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते, असे पाटील यांनी सांगितले.
तीन वर्षांनंतर उत्पन्न
पहिली तीन वर्षे बांबू पिकातून उत्पन्न मिळत नाही. परंतु आंतरपिकातून उत्पन्न घेऊ शकतो. भात, भुईमूग, भाजीपाला अशा प्रकारची अनेक पिके आंतरपीक म्हणून घेता येतात. बांबू ही २४ तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. त्यामुळे दूषित हवा शुद्ध करते म्हणून केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने बांबू लागवडीवर भर दिला.
तरुणांना संदेश
बांबूपिकासारखी अनेक उत्पन्न देणारी पिके घेता. येतील बांबूला सध्या मागणी आहे. बांबूपासून फर्निचर, अगरबत्ती स्टिक, शोभेच्या वस्तु, शेतकऱ्यांच्या टोमॅटो, द्राक्ष, वेलवर्गीय बगीच्यात सपोर्ट देण्यासाठी बांबूचा उपयोग होतो. बांबू हा ऊसशेतीला उत्तम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.