पुनवत : शिराळा तालुक्याच्या पश्चिम पट्टयात भाताचेपीक फुलोऱ्यात आले असून, सरत्या हंगामात पावसाची साथ लाभल्यास लवकरच ते काढणीयोग्य होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
भाताचे यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शिराळा तालुक्यात यंदा जून, जुलैमध्ये खरीप हंगामातील भाताची टोकण, रोपण तसेच कुरीच्या साहाय्याने पेरणी केली आहे.
जुलै-ऑगस्ट दरम्यान वारणेला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे; मात्र पूरपट्टा वगळता इतरत्र भाताचे पीक समाधानकारक आले आहे.
भात पिकासाठी आतापर्यंत पावसाची चांगली साथ लाभली आहे. सध्या सर्वत्र भाताचे पीक फुलोऱ्यात आल्याचे दिसून येत आहे. भात पिकात लोंब्या तरारून आल्या आहेत.
अनेक ठिकाणी भातावर करपा, खोड किडी, भुंगा, लोद अळी अशा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचेही पाहावयास मिळत आहे. या रोगाबाबत शेतकरी अधिकची काळजी घेत आहेत.
शिराळा तालुक्यात यंदा रत्ना १, कोमल, रत्नागिरी २४, रत्नागिरी ८ अशा वाणांची पिके सर्वत्र अधिक प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. काही शेतकऱ्यांनी मोठ्या भाताला प्राधान्य दिले आहे.
ही भात पिके तीन ते साडेतीन महिन्यांत परिपक्व होतात. सध्या भात पीक अंतिम टप्प्याकडे चालली आहेत. सध्या अंतिम टप्प्याकडे चाललेल्या भात पिकाला अजून किमान पंधरा दिवस पावसांची साथ मिळणे गरजेचे आहे. गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मी दोन एकरामध्ये भात पीक घेतले आहे. काही ठिकाणी पुरामुळे नुकसान झाले. उर्वरित भाताच्या चांगल्या उत्पन्नासाठी उत्तम पीक संगोपन केले असून यंदा ७० ते ८० पोती भात उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. - जालिंदर शेळके, माजी सरपंच, शेतकरी पुनवत