नागपूर : देशांतर्गत बाजारात सरकीचे दर स्थिर असले तरी जागतिक कापूस बाजारात रुईच्या दरात थाेडी तेजी आली आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून दबावात असलेले कापसाचे दर हळूहळू वाढू लागले आहे. सध्या कापसाच्या दराने प्रति क्विंटल सात हजार रुपयांची पातळी ओलांडली असून, ही पातळी आठ हजार रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दरवाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करणे गरजेचे आहे.
जागतिक बाजारात मागील पंधरवड्यापासून रुईचे दर वाढायला सुरुवात झाली. सरासरी ५७ हजार रुपये प्रति खंडी असलेले रुईचे दर हळूहळू ६३ हजार रुपये प्रति खंडीवर पाेहाेचले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील कापसाच्या दरवाढीवर झाला आहे. सध्या पावसात भिजलेल्या कापसाला ६,८०० ते ७,००० रुपये तर चांगल्या प्रतिच्या कापसाला ७,००० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
मध्यंतरी दर कमी झाल्याने कापसाची आवक थाेडी वाढली हाेती. चालू कापूस हंगामात देशभरात २०० लाख गाठी कापूस बाजारात आला असून, सध्या राेज आवक ही ८ ते ९ लाख क्विंटल एवढी आहे. व्यापाऱ्यांकडील पैशाचे ‘राेटेशन’ विचारात घेता दरवाढ टिकून ठेवण्यासाठी ही आवक वाढू न देता कमी करणे अथवा स्थिर ठेवणे आवश्यक आहे.
निर्यात स्वस्त, आयात महाग
जागतिक बाजार व इतर देशांच्या तुलनेत भारतात कापसाचे दर कमी आहे. त्यामुळे भारतीय वस्त्रोद्याेगाने रुई किंवा सूत आयात करण्याचा विचार केल्यास त्यांना ही आयात महाग पडणार आहे. दुसरीकडे, जगात कापसाचे उत्पादन कमी असल्याने तसेच मागणी हळूहळू वाढत असल्याने भारताला कापूस निर्यातीची संधी चालून आली आहे. भारताने ही संधी ‘कॅश’ केल्यास कापसाचे दर आठ हजार रुपये प्रति क्विंटलची पातळी ओलांडू शकते. त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना हाेऊ शकताे.
मागणीत वाढ
सध्या कापूस विक्री हंगाम अंतिम टप्प्यात आहे. देशांतर्गत वस्त्रोद्याेगाला लागणाऱ्या कापसाच्या मागणीत वाढ हाेत आहे. मार्चपासून पुढे ही मागणी आणखी वाढणार आहे. आयातीत कापूस महागात पडणार असल्याने भारतीय वस्त्रोद्याेगाला देशांतर्गत बाजारातून रुई व सुताची खरेदी करावी लागणार आहे. आगामी काळ निवडणुकीचा असल्याने ‘टेक्सटाइल लाॅबी’ने कापसाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी चालविल्या प्रयत्नांना फारसे यश येण्याची शक्यता नाही.
शेतकऱ्यांनी वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी आधी बाजारातील दराचा आढावा घ्यावा. कापूस एकमुस्त न विकता टप्प्याटप्प्याने विक्री करावी. कापूस विकण्यासाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा, मार्च व एप्रिल असे तीन टप्प्यात गरजेनुसार नियाेजन करावे.
- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र.