भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली मार्फत देशात विविध संशोधन प्रकल्प राबविले जातात. त्याअंतर्गत अखिल भारतीय मधमाशी व परागीभवन करणारे कीटक समन्वयित प्रकल्प देशातील २४ राज्यांमध्ये राबविला जात आहे. ह्या प्रकल्पामध्ये मधमाशी, इतर परागीभवन करणारी कीटक, संशोधन व विस्तार हे कार्य केले जाते. ह्या प्रकल्पाची वार्षिक आढावा बैठक नुकतीच ४ ते ६ सप्टेंबर, २०२३ रोजी बेंगलोर कृषी विद्यापीठात पार पडली. ह्यावेळी देशातील विविध केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यामधील आदिवासी बांधवांसाठी केलेल्या उत्कृष्ट व देशात सर्वोत्तम कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती केंद्राला पुरस्कार देण्यात आला. ह्यावेळी प्रकल्पाचे देशाचे समन्वयक डॉ. सुनील सुरोशे, कृषी विद्यापीठ बेंगलोर कुलगुरू डॉ. सुरेश, डॉ चुनेजा, डॉ. भट व इतर मान्यवर उपस्थित होते.
ह्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती हे २०१७-१८ पासून कार्य करत आहे. ह्यामध्ये डाळिंब pomegranate पिकासाठी मधमाशीचे महत्त्व, पीक उत्पादनवाढ, मध व इतर उत्पादने, वनस्पती फुलरा व स्थलांतर व्यवस्थापन, प्रशिक्षणे व आदिवासी विकास योजना राबविणे असे विविध उपक्रम राबविले जातात. २०१७- १८ पासून काम करत असताना केंद्रामार्फत अनेक प्रशिक्षणे घेण्यात आली. यामध्ये पेटी व इतर साहित्य वाटप मध उत्पादक शेतकरी उत्पादक कंपनी व असे अनेक कामे राबविली आहेत.
केंद्रामार्फत २०१५ ते २०१८ या कालावधीत आशिया खंडातील पहिला पथदर्शी प्रकल्प मधूसंदेश राबविण्यात आला होता. ह्यात डाळिंब उत्पादनासाठी मधमाशीच्या परागीभवनाद्वारे ३०-४२% टक्के उत्पादनात वाढ होते, हे सिद्ध झाले होते. तसेच, एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रणालीच्या अवलंबनाने साधारण ४०% उत्पादन खर्च कमी होऊन विषमुक्त उत्पादन तयार झाले आहे.
केंद्रामार्फत पुढील कालावधीत महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनी माध्यमातून मध उत्पादनाला चालना देण्याचे काम करण्याचा मानस आहे, असे राजेंद्र पवार, चेअरमन, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांनी सांगितले. संस्थेमार्फत विविध प्रशिक्षणे राबवून उद्योजकता विकासाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्याचे निलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांनी सांगितले.
मधमाशी व इतर पूरक उद्योगांसाठी नाबार्ड, आत्मा व इतर संस्थाबरोबर काम करत असल्याचे डॉ. मिलिंद जोशी, प्रकल्प समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी सांगितले. पुढील काळात राणीमाशी पैदास, इतर उत्पादने व गुणवत्ता, जागरूकता, प्रशिक्षणे ह्यासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले. ह्या पुरस्कारासाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी, निलेश नलावडे कृषि विज्ञान केंद्र, बारामती प्रमुख, धीरज शिंदे यांनी आनंद व्यक्त केला व मिलिंद जोशी, अल्पेश वाघ, प्रशांत गावडे, सचिन क्षीरसागर व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.