कऱ्हाड : कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. तसेच पावसामुळे कोयना नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या फळ्याही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीतील पाणीपातळी कमालीची घटली आहे.
अनेक महिन्यांनी मच्छिमारांना नदीत मासे सापडत आहेत. अशातच तांबवे येथील एका मच्छिमाराला कोयना नदीच्या डोहात तब्बल २५ किलोचा कटला मासा सापडला. हा मासा पाहण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली.
तांबवे येथील मच्छीमार हजरत पठाण यांनी कोयना नदीच्या डोहात जाळी टाकली होती. सकाळी एका जाळ्यात भला मोठा कटला मासा अडकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी अन्य मच्छिमारांच्या मदतीने हा मासा आपल्या घरी आणला.
हा मासा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. सात-आठ ग्राहकांनी हा मासा २०० रुपये किलो दराने खरेदी केला. नदीतील कटला मासा ग्राहक आवडीने खरेदी करतात.
संपूर्ण उन्हाळ्यात कोयना धरणातून पाणी सोडणे सुरू होते. तसेच टेंभू योजना, नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले होते. पाण्याच्या फुगवट्यामुळे कोयना नदीपात्र तुडुंब होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मासे सापडत नव्हते.
पावसाळ्याच्या सुरुवातीला बंधाऱ्यांच्या फळ्या काढून पाणी सोडून देण्यात आल्यामुळे सध्या नदीची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे मच्छिमारांना नदीतील मोठे मासे सापडत आहेत. ते पाहण्यासाठी गर्दी होत असते.
अधिक वाचा: Fishery खोल समुद्रातील मासेमारी संकटात, मग मत्स्यशेती करा