चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली धरणाचे दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू केले आहे, त्यातून १५९२ क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे.
गतवर्षी पेक्षा यावेळी ९२५ मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे. तसेच पाच टीएमसी पाणीसाठाही जास्त आहे. तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्प, तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. धनगरवाडा येथे २६५ मिमी ढगफुटीसदृश पाऊस पडला.
वारणा नदीपात्राबाहेर पडल्याने नदीकाठावरील पिके, स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. मोरणा व गिरजवडे मध्यम प्रकल्प, तसेच करमजाई, अंत्री बुद्रुक, टाकवे, शिवणी, रेठरे धरण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ४९ पाझर तलावांपैकी ३७ तलाव पूर्ण क्षमतेने, तसेच १२ तलाव साठ टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहेत.
चांदोली धरणात सोमवारी दुपारी चार वाजता २७.३५ टीएमसी एकूण, तर २०.४७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण ७९.४८ टक्के भरले आहे. चोवीस तासांत दोन टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. चांदोली धरणातून १५९२ क्यूसेकने पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येत असून, २७ हजार ५५७ क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.
वारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने कोकरूड-रेठरे बंधारा, मांगले-सावर्डे पूल, समतानगर पूल, येळापूर-वाकुर्डे पूल, कांदे मांगले, सावर्डे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. मणदूर सम्राट अशोकनगर दरम्यानचा फरशी पूल वाहून गेला आहे, मणदूर ते जाधववाडी दरम्यान असणान्या खिंडीजवळ घाटात एका ठिकाणी रस्ता खचला आहे.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन सोमवारी पाण्याने सांडवा पातळी गाठली. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून येत्या २४ तासांत वक्र दरवाजाद्वारे केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस मिमीमध्ये
• चांदोली धरण १४८ (१६२५)
• पाथरपुंज २०६ (३४५०)
• निवळे १९८ (२७६२)
• धनगरवाडा २६५ (१६७३)