शिराळा : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेले तीन दिवस अतिवृष्टी तसेच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने सोमवारी दुपारी दोन वाजता ०.२५ मीटरने चारही दरवाजे उघडले आहेत.
वीजनिर्मिती केंद्रातून विसर्गात वाढ केली आहे. यामुळे २४६५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला असून वारणा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण क्षेत्रातील पाथरपुंज येथे १३७, निवळे १४२, धनगरवाडा ९६, चांदोली २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच तालुक्यातील सर्वच मंडल क्षेत्रात यावर्षीच्या एकूण एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहापासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे झपाट्याने पाणीपातळीत वाढ होत आहे.
धरणाचे चारही वक्राकार दरवाजे सोमवारी दुपारी दोन वाजता ०.२५ मीटरने उघडले आहेत. यातून १००० व वीजनिर्मिती केंद्रातून १४६५ विसर्ग असा एकूण २४६५ क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. चांदोली धरणात एकूण ३२.३३ टीएमसी म्हणजेच ९३.९६ टक्के साठा आहे.
चांदोली धरण क्षेत्रात पडलेला पाऊस (कंसात एकूण पाऊस मिमीमध्ये)
पाथरपुंज १३७ (६४५७)
निवळे १४२ (५२५७)
धनगरवाडा ९६ (३३३८)
चांदोली धरण १४ (३३१५
चांदोली धरणाच्या जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणांतून २४५६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. - मिलिंद किटवाडकर, उपअभियंता, चांदोली धरण