शिराळा/वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेली चार दिवस अतिवृष्टी तसेच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ०.४० मीटरने चारही दरवाजे उघडले आहेत.
दरवाजातून २४३० तसेच वीजनिर्मिती केंद्रातून १४३५ विसर्ग ३८६५ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण क्षेत्रातील पाथरपुंज येथे १५२, निवळे १३६, धनगरवाडा ८४, चांदोली ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच तालुक्यातील सर्वच मंडल क्षेत्रात यावर्षीच्या एकूण एक हजार मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेली चार दिवस अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे झपाट्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणाचे चारही वक्राकार दरवाजे सोमवारी दुपारी दोन वाजता ०.२५ मीटरने व आज मंगळवारी ०.४० मीटरने उघडण्यात आले आहेत.
यातून २४३० व वीजनिर्मिती केंद्रातून १४३५ विसर्ग असा एकूण ३८६५ क्यूसेकने विसर्ग तसेच १३३५५ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. चांदोली धरणात एकूण ३३.४८ टीएमसी म्हणजेच ९७.३० टक्के साठा आहे. उपयुक्त २६.६० टीएमसी साठा आहे.
चांदोली क्षेत्रात पडलेला पाऊस (कंसात एकूण पाऊस मिमीमध्ये)
पाथरपुंज १५२ (६६०९)
निवळे १३६ (५५३५)
धनगरवाडा ८४ (३४२२)
चांदोली धरण ९४ (३३१५)
चांदोली धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणांतून ३८६५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. - मिलिंद किटवाडकर, उपअभियंता, चांदोली धरण