मिरची पिकाने यंदा सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. उन्हाळी मिरचीवर कोकडा, मावा व व्हायरस आल्याने जवळपास २ हजार हेक्टरवरील मिरचीची रोपटे शेतकऱ्यांनी उपटून फेकली असून सुमारे ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्र या व्हायरसमुळे धोक्यात सापडले आहे. यात शेतकऱ्यांचे सुमारे हजार ते बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी सिल्लोड तालुक्यात ५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मिरचीची लागवड झाली होती. त्यातून जवळपास ९०० कोटी रुपयांची उलाढाल होऊन अनेक शेतकरी मालामाल झाले होते. यामुळे यावर्षी मिरचीचे क्षेत्र वाढून ६ हजार ८०० हेक्टरपर्यंत पोहोचले, भावपण १० ते १२ हजार रुपये क्विंटल मिळत आहे. मात्र, व्हायरस आल्याने उत्पादन कमालीचे घटले आहे.
तालुक्यात केवळ शासकीय दप्तरी नोंदणीकृत ३ नर्सरी आहेत. मात्र, १० ते १२ अवैध नर्सरी असून त्यांची कुठेच नोंद नाही. या नर्सरी चालकांनी निकृष्ट मिरचीची रोपे तयार करून काही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
सी-१ नावाच्या मिरची वाणावर जास्त प्रमाणात व्हायरस पसरलेला असून इतर नामांकित वाणांवर हा रोग कमी प्रमाणात आहे. मात्र, काही नर्सरी चालकांनी वेगवेगळ्या कंपनीचे निकृष्ट वाण शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.
धावडा येथील एका नर्सरीतून सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास दीड लाख सी १ या मिरची वाणाची रोपे खरेदी केली आहेत. या वाणावरच जास्त व्हायरसचा प्रभाव असून झाडांना फूले लागत नाहीत. तसेच पाने उलटी होत आहेत. औषधे फवारली तरीही फायदा झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी ती रोपटे उपटून फेकली आहेत. यात लागवड खर्च वाया गेला असून, होणारे उत्पादन बुडाले, असा हजार ते बाराशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
धावडा येथील नर्सरी चालकास नोटीस
निकृष्ट मिरची रोपटे दिल्याचा आरोप करून सिल्लोड तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दिली होती. यामुळे कृषिशास्त्रज्ञ नैनवाड, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे, पं. स. कृषी अधिकारी संजय व्यास यांनी धावडा येथील एका नर्सरीला शुक्रवारी भेट देऊन चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्याचे लायसन्स निलंबित करण्याचा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्याकडे पाठवला आहे.