सुनील चरपे
नागपूर : मध्य व दक्षिण भारतातील कापूस हंगाम सुरू हाेऊन महिना पूर्ण झाला आहे. राज्यातील अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ अजूनही बंद असून, त्या सुरू हाेण्याची शक्यता मावळली आहे. अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ केवळ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. कापसाच्या उत्पादनातील घट आणि मंदावलेली बाजारातील आवक यामुळे ‘जिनिंग-प्रेसिंग’ उद्याेग संकटात सापडल्याने राज्यात किमान २५ हजार कामगार बेराेजगार झाले असून, ही परिस्थिती संपूर्ण देशभर आहे.
देशभरात एकूण ३,४६० ‘जिनिंग-प्रेसिंग’ असून, या उद्याेगात गुजरात प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. एक ‘जिनिंग-प्रेसिंग’ उद्याेग किमान ५० लाेकांना किमान सात महिने राेजगार उपलब्ध करून देताे. मागील पाच वर्षांपासून प्रक्रिया करायला लागणारा कच्चा माल म्हणजेच कापूस पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने ‘जिनिंग-प्रेसिंग’ उद्याेग संकटांचा सामना करीत आहे. वर्षागणिक हे संकट आणखी गडद हाेत आहे.
सदाेष व कालबाह्य झालेले बियाणे, प्रतिकूल हवामान व राेग व किडींचा वाढता प्रादुर्भाव यामुळे दरवर्षी कापसाचा उत्पादन खर्च वाढत असून, उत्पादन घटत आहे. चांगला दर मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी टप्प्याटप्प्याने व यथावकाश कापसाची विक्री करीत असल्याने बाजारातील आवकही मंदावली आहे.
देशातील वस्त्राेद्याेगाला कमी दरात रुई व सूत हवे असल्याने टेक्सटाइल लाॅबी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून कापसाचे दर नियंत्रित करीत असल्याने वस्त्राेद्याेगाच्या साखळीतील शेतकरी, ‘जिनिंग-प्रेसिंग’ व ‘स्पिनिंग मिल’ या तीन कड्या संकटात सापडल्या आहेत. प्रक्रिया करायला पुरेसा कापूस मिळत नसल्याने ‘जिनिंग-प्रेसिंग’ उद्याेग बंद ठेवावे लागतात किंवा ४० ते ६० टक्के क्षमतेचे चालवावे लागतात, अशी माहिती राज्यातील जिनर्सनी दिली.
देशभरातील ‘जिनिंग-प्रेसिंग’
गुजरात - ९४०
मध्य प्रदेश - ४९०
महाराष्ट्र - ८६५
तेलंगणा-आंध्र प्रदेश - ५४०
हरयाण-पंजाब-राजस्थान - ३८०
कर्नाटक-तामिळनाडू - २७५
ओडिशा - ००५
देशातील कापूस उत्पादनात घट
वर्ष - एकूण उत्पादन
२०१८-१९ - ३३३.०० लाख गाठी
२०१९-२० - ३६५.०० लाख गाठी
२०२०-२१ - ३५२.४८ लाख गाठी
२०२१-२२ - २९८.१० लाख गाठी
२०२२-२३ - ३१५.०५ लाख गाठी
कापूस उत्पादन व ‘जिनिंग’ संख्या
अमेरिकेत दरवर्षी कापसाचे सरासरी १८० ते २०० लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेत असून, तिथे एकूण ‘जिनिंग’ची संख्या केवळ १११ आहे. भारतातील कापसाचे सरासरी उत्पादन ३०० लाख गाठींचे असून, मागणी व वापर ३४५ लाख गाठींचा आहे. देशभरात ‘जिनिंग-प्रेसिंग’ची संख्या ही ३,४६० आहे. एक ‘जिनिंग-प्रेसिंग’ २४ तास चालविण्यासाठी किमान ४० क्विंटल कापसाची आवश्यकता असते.
कच्च्या मालाची कमतरता
हिंगणघाट (जिल्हा वर्धा) तालुक्यात एकूण २५ ‘जिनिंग’प्रेसिंग’ आहेत. या ‘जिनिंग’ला पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी किमान २० लाख गाठी कापसाची आवश्यकता असून, १० लाख गाठी कापूस उपलब्ध हाेताे. त्यामुळे सुरू असलेल्या ‘जिनिंग’ ४० ते ६० टक्के क्षमतेचे चालवाव्या लागतात, अशी माहिती ओम डालिया यांनी सांगितले.
जास्त रुईचे वाण हवे
भारतातील रुईची उत्पादकता ही केवळ ४७० किलाे प्रति हेक्टर असून, इतर देशांमध्ये ही उत्पादकता ८०० ते १,५०० किलाे प्रति हेक्टर आहे. ‘जिनिंग-प्रेसिंग’ उद्याेगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी रुईचे अधिक उत्पादकता असलेले कापसाचे वाण हवे आहेत. त्यासाठी देशातील शेतकऱ्यांना तण, राेग व कीड प्रतिबंधक तसेच रुईचे अधिक प्रमाण असलेले बियाणे उपलब्ध करून देणे, बियाणे तंत्रज्ञानावरील बंदी हटविणे आणि कापसाचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. यासाठी देशाचे कापूस उत्पादन व वस्त्राेद्याेग धाेरण प्रभावी असणे आवश्यक आहे.