नासीर कबीर
करमाळा : जिथं ज्वारी, बाजरी पिकत असे अशा दुष्काळी पट्टयातील माळरानावर शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रुट्स शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे.
ड्रगनफ्रुट्समध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असल्याने डॉक्टर रुग्णांना ड्रॅगनफ्रूट्स खाण्याचा सल्ला देत असल्याने पुणे, मुंबई, नागपूर या मोठ्या शहरांतून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
करमाळा तालुक्यात दुष्काळी भागातील लव्हे, उमरड, निंभोरे, केम, वरकटने, झरे, घोटी, आदी ३६ गावांच्या भागात गेल्या दोन वर्षांपासून ड्रॅगनफ्रुटचे उत्पादन घेतले जात आहे. उत्पादन चांगले मिळत असल्याने ड्रॅगनफ्रुटच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
सुरुवातीला जास्त खर्च होत असला तरी खर्चाच्या तुलनेत ८० ते १५० रुपये किलोचा दर मिळत आहे. व्यापारी शेतकऱ्याकडून थेट माल उचलत असल्याने बाजारपेठ शोधावी लागत नाही. शिवाय फवारणी खत, औषधांचा खर्चही माफक स्वरूपाचा आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ड्रॅगनफ्रुट उपयुक्त
ड्रॅगनफ्रूटमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असून, यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी व विटॅमिन ई या फळात भरपूर प्रमाणात आहे. कोरोना, डेंग्यू, मलेरिया, कावीळ यासह इतर सर्वच आजारांसाठी ड्रॅगनफुट अत्यंत फायदेशीर ठरते.
करमाळा तालुक्यात ऊस, केळीपाठोपाठ एक वेगळा प्रयोग म्हणून ड्रॅगनफुट्सची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. सुरुवातीला ड्रॅगनफुटची लागवड करणे खर्चिक असले तरी शासनाकडून प्रतिहेक्टरी एक लाख ६० हजार अनुदान देण्यात येत आहे. त्यानंतर यातून चांगले उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. बारा ते चौदा महिन्यांत फळे देण्यास सुरुवात होते. व्यापारी शेतातून माल नेत असल्याने मार्केटची चिंता राहिलेली नाही. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात ड्रॅगनफ्रुटची लागवड झाली आहे. - संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, करमाळा
तीन वर्षांपूर्वी ड्रॅगनफ्रुटची लागवड केली आहे. सुरुवातीला एक एकर ड्रॅगनफुटची लागवड केली. यावर्षी ड्रॅगनफ्रुट्सच्या एक एकर शेतीतून दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शेतकऱ्यांना ड्रॅगनफ्रुटची शेती जरी खर्चिक वाटत असली तरीदेखील उत्पन्न त्याच पद्धतीने मिळत आहे. - पंडित वळेकर, शेतकरी, निंभोरे