Lokmat Agro >शेतशिवार > Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं

Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं

Drought Story Five lakhs spent on water to sustain orchards; Still the no good income from farming | Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं

Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं

माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात.

माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात.

शेअर :

Join us
Join usNext

नितीन काळेल
सातारा : माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात.

त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांचा यावरच चार-पाच लाखांपर्यंत खर्च झालाय. तरीही उत्पन्नाबाबत ठेंगाच आहे. त्यातच दुष्काळ असूनही शासनाकडून दमडीचीही मदत झाली नसल्याचा आरोप होत आहे.

माण तालुक्याचा तसेच सातारा जिल्ह्याचाही पूर्व भाग म्हणजे हवालदारवाडी, कारखेल ही गावे. या भागात फळबागांचे प्रमाण अधिक आहे. येथील शेतकरी कष्टाळू त्यामुळे एकेकाच्या पाच, दहा एकरापर्यंतही डाळिंब आणि आंब्याच्या बागा आहेत; पण या बागांना दृष्ट लागली आहे. कारण गेल्यावर्षी पाऊस झाला नसल्याने दुष्काळ पडला, विहिरी आटल्या.

पाणी नसल्याने बागा वाळू लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यासाठी गावाच्या शेजारीच सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. शेजारील माळशिरस तालुक्यात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे हे शेतकरी सुमारे १५ किलोमीटर अंतरावरून सोलापूर जिल्ह्यातून विकत पाणी आणत आहेत.

साडेतीन हजार रुपयांना ३० हजार लिटरचा टँकर मिळतोय, मागील काही महिन्यांपासून पाण्यावरच पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे, तरीही फळबागातून चांगले उत्पन्न मिळेलच, याची शास्वती नाही.

हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकरी उद्धव उदंडे यांची सात एकर आंबा, तर डाळिंबाची अडीच एकर बाग आहे. या बागा जगविणे आणि जनावरांसाठी दररोज एक पाण्याचा टँकर लागतोय, आतापर्यंत त्यांचा पाण्यावर पाच लाख रुपये खर्च झाला आहे.

तरीही त्यांना आंब्यातून फक्त चार ते साडेचार लाख रुपयेच उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. त्यांचा आतापर्यंत खत, मजुरी, पाणी, औषधावर १० लाखांपर्यंत खर्च झाला आहे. झाडे जपली पाहिजेत. ती वाळवून परत काय करायचे असे म्हणत खर्च करावाच लागतो.

पुढील वर्षी चांगले उत्पन्न मिळेल असे ते सांगतात. कारण, यंदा आंबा उन्हाने खराब झालाय, तसेच पुरेसे पाणी न मिळाल्याने झाडे वाळू लागली आहेत. फक्त सध्या झाडे जगविण्याचेच काम सुरू आहे. अशीच स्थिती परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे, तरीही शासन मदत करत नाही, अशी खंतही हे शेतकरी व्यक्त करीत आहेत.

५० एकर जमीन अन् विहिरी पाच
शेतकरी हणमंत तुकाराम फडतरे यांची जवळपास ५० एकर जमीन आहे. त्यातील ४० एकर बागायत. त्यासाठी पाच विहिरी आहेत; पण आतापर्यंत आंबा आणि डाळिंबासाठी पाणी विकत घ्यावे लागले. त्यावर दोन लाख रुपये खर्च झाला आहे.

६० किलोमीटरवरून चारा; दुधाचे पैसे त्यावर खर्च
माण तालुक्यातच ओला चारा मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीतून हिरवा चारा विकत आणला आहे. त्यावर दुभती जनावरे आहेत. दुधाचे पैसे चाऱ्यावर अशीच शेतकऱ्यांची धारणा झालेली आहे. तर जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत. सव्वा लाखाची गाय ६० हजारांना मागण्यात आली, असेही एका शेतकऱ्याने सांगितले.

गावात दुष्काळ पडला आहे. परिसरात कोठेही पाणी नाही. सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणून बागा जगवत आहे; पण उत्पन्न कमी असल्याने तोटाच होणार आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असून मदत मिळायला हवी. तसेच बागांचा विमाही भरलाय. त्यातून तरी मदत व्हावी; पण आतापर्यंत काहीच मदत मिळालेली नाही. बागा वाळवून चालत नाही म्हणून पाण्यावर खर्च करावा लागत आहे. - उद्धव उदंडे, शेतकरी

कारखेल गावाला दिवाळीपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गावातील ५०० फूट खोलवरील बोअरलाही पाणी नाही. माझी १० एकर डाळिंब बाग असून माळशिरस तालुक्यातून पाणी विकत आणतोय. आतापर्यंत पाण्यावरच तीन लाख रुपये खर्च झाला आहे. बाग जाळून चालत नाही. फळबागांचा विमा भरला आहे, त्यातून तरी शेतकऱ्यांना मदत व्हावी हीच
मागणी आहे. - शशिकांत गायकवाड, सरपंच, कारखेल

Web Title: Drought Story Five lakhs spent on water to sustain orchards; Still the no good income from farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.