पुणे : राज्यामध्ये किमान तापमानात चांगलीच घट झाली असून, पुण्यात सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरामध्ये बुधवारी १२.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर राज्यात बहुतांशी भागात तापमानाचा पारा १३ ते १६ अंशांच्या दरम्यान राहिला.
पुढील आठवडाभर राज्याच्या किमान आणि कमाल तापमानातील आणखी घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. गेल्या रविवारपासून राज्यामध्ये थंडीत वाढ होताना दिसून येत आहे.
ही थंडीतील वाढ आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आकाश निरभ्र राहून व पंजाब, हरयाणा आणि राजस्थान दरम्यान असणाऱ्या हवेच्या उच्च दाब क्षेत्रामुळे ईशान्यकडून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यामुळे राज्यातील थंडीत वाढ होत आहे.
येत्या २६ नोव्हेंबरनंतर थंडीतील सातत्य जैसे थे राहण्याचा अंदाज आहे. तरी त्या दरम्यान बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राची शक्यता आहे.
या शक्यतेमुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या चार दिवसांत म्हणजे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड अशा नऊ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे.
अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या नऊ जिल्ह्यांत चार दिवसांत म्हणजे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान थंडीला काहीसा विराम मिळू शकतो.
राज्यातील तापमान
पुणे १२.२
जळगाव १३.२
कोल्हापूर १७.२
महाबळेश्वर १३.२
नाशिक १२.४
सांगली १५.८
सोलापूर १७.४
मुंबई २३.२
परभणी १३.६
नागपूर १३.६
अधिक वाचा: Vij Bill Savlat : वीजबिलात सवलत हवी असेल तर हे करा मिळेल इतकी सूट