सूर्यकांत किंद्रे
भोर : तालुक्याच्या पश्चिम भागात धुळवाफेवरच भाताचीपेरणी होऊन तरवे उगवले आहेत. तर पूर्व भागातील पेरणी अंतिम टप्प्यात असून आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाची वाट पाहात आहे भोर तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. त्यासाठी ६५० हेक्टरवर भाताचे रोपवाटिका टाकण्यात आले आहेत.
इंद्रायणी तांदूळ सुवासिक आणि चवीला चांगला असल्याने तालुक्यात सर्वाधिक इंद्रायणी भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नाचणी पिकाचे सरासरी क्षेत्र १२८५ हेक्टर आहे व ६५ हेक्टरवर रोपवाटिका टाकल्या आहेत.
सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र २८६२ हेक्टर आहे व पेरणी १०५० हेक्टर. भुईमूग पिकाचे सरासरी क्षेत्र २८३२ हेक्टर आहे व पेरणी २६० हेक्टर केली आहे. भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरादेवघर धरण भागातील हिरडोशी खोरे, भाटघर धरणा भागातील वेळवंड व भुतोडे खोऱ्यात व महुडे भागात मे महिन्यात वळवाचे पाऊस पडल्यावर धूळ वाफेवरच भाताची पेरणी केली जाते.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करून सध्या भाताची रोपे जमिनीवर आले असून तरवे चांगले उगवले आहेत. पूर्व भागातील शेतकरी चांगला पाऊस झाल्यावर जमिनीला वापसा आल्यावर भाताच्या रोपांची पेरणी करतात. सध्या वीसगाव आंबवडे, महुडे भागातील पेरणी पूर्ण झाली असून महामार्गावरील गावे भोंगवली पट्टयात पेरण्या अंतिम टप्प्यात आली आहे.
मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर होऊन पावसाची वाट पाहात आहे. दरम्यान पश्चिम भागात पेरणी होऊन भाताची रोपे जमिनी बाहेर आली आहेत. तर पूर्व भागातील पेरणी अंतिम आहे.
मात्र पावसाने मागील आठ दिवसापासून दांडी मारली असून कडक उन्हाळा झालेला आहे. यामुळे रोपे सुकू लागली आहेत. पाऊस असाच राहिल्यास भाताची रोपे खराब होतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
इंद्रायणीला सर्वाधिक मागणी
भोर तालुक्यात इंद्रायणी, बासमती, आंबेमोहोर, तामसाळ या गरव्या भाताची लागवड केली जाते. लागवडीनंतर साधारणपणे १०० ते १२० दिवसांनी भात काढायला येते पाणी अधिक प्रमाणात लागते. तर तालुक्यात इंद्रायणी भाताला सर्वाधिक मागणी असून मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करतात तर हळव्या जातीचे रत्नागिरी २४, कर्जत कोळंबा भात म्हणजे कमी पाण्यावर येणारे भात असून ९० ते १०० दिवसात कापणीला येणारे भात पीक आहे.
अधिक वाचा: Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा