पेण हेटवणे मध्यम प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ५२ गावातील ६६६८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणून जिरायती शेतीचं रूपांतर बागायती शेतीमध्ये करणे हा शासनाचा उद्देश होता.
उन्हाळ्यात हेटवणे सिंचनाच्या पाण्यावर लागवड केलेली शेती परिपक्व होऊन शिवारात कणसंभार झालेली भातपिके काढणीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे. उन्हाळी भातशेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत येथील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेती लागवडीकडे वळले आहेत.
पेणमधील हेटवणे मध्यम प्रकल्पाची निर्मितीने पेण खारेपाटातील शेती ओलिताखाली येऊन शेती समृद्ध व्हावी, यासाठी झाली होती. हेटवणे धरणाची एकूण पाणीपातळी ८३ मीटर इतकी आहे. धरण जुलै महिन्यात पूर्ण भरते. सिंचनासाठी पाणी आरक्षित करून पूर्वीच ठेवले आहे. ८८ दशलक्ष घनमीटर सिंचनाचे पाणी शेतीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.
अनेकांना ठरतेय उन्हाळी भातशेती फायद्याची
उन्हाळी भातशेती फायद्याची ठरते, हा अनुभव लक्षात घेत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जिते गावातील शेतकऱ्यांनी सिडको जलशुद्धीकरण केंद्र या भागात सतत वाहणारे पाणी भातशेतीसाठी उपयोगात आणले. येथे २०० एकरावर लागवड करून गेली सात-आठ वर्षे उन्हाळी भातशेतीचे उत्पादन घेतले जात आहे.
भातपीक काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू
• ६६६८ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती व ५२ गावांचा हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. यापैकी १९ किलोमीटरपर्यंत कालव्याच्या पाण्यावर सुमारे २००० एकरावर भातशेती केली जाते.
• सध्या भातपीक पूर्ण तयार झाले आहे तर शेतकरी बांधव कापणीला आलेली पिके काढण्याच्या तयारीत गुंतला आहे.
• हेटवणे धरण प्रकल्पालगत असलेल्या कामाली, आधरणे, तळवली, सापोली, बोरगाव, शेणे रोडे, काश्मीरे, या ओलिताखालील गावांतील शेतजमिनीत शेतकरीवर्ग उन्हाळ्यात भातशेती, भाजीपाला, फुलशेती व थोड्या प्रमाणात कलिंगड शेती करतो.
• मुबलक सिंचनाचे पाणी, भरपूर सूर्यप्रकाश व खतांची मात्रा यामुळे उत्पन्नाचे गणित सोपे सुलभ होते.
अधिक वाचा: BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे