दीपक शिंदे
सातारा : नवीन आले आणि जुन्या आल्याच्या दरावरून सध्या आले उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये घमासान सुरू आहे. व्यापारी नवीन आल्यासाठी गाडीला १४ ते १५ हजार दर तर जुन्या आल्यासाठी ४९ ते ५१ हजार असा दर मिळत आहे.
या दरातील तफावत मोठी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांकडून १० टक्के व्यापारी हे मिश्र आले घेत आहेत, मात्र ९० टक्के व्यापारी अजूनही प्रतवारी करत असल्याने शेतकऱ्यांसमोर डोकेदुखी वाढली आहे.
शेतातील आले काढल्यानंतर त्याला चांगला दर मिळावा आणि ते लवकर विकले जाऊन चार पैसे हातात मिळावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. चांगल्या दरासाठी शेतकरी कधी-कधी दीड-दीड वर्ष आले शेतातच ठेवतो.
आल्याला नवीन आले फुटते या आणि त्याची मोठी गड्डी तयार होते. मात्र, व्यापारी नवीन आले आणि जुने आले, हे वेगवेगळे करून ते वेगळ्या दराने शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, असे झाले तर गाडीला ५ ते ७ हजारांचा म्हणजेच एकराला ८० ते ९० हजार रुपये तोटा होत आहे.
याविरोधात शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाज उठविला असून, शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सौदे बंद करावेत आणि जोपर्यंत जुने आणि नवीन आले एकत्र खरेदी केले जात नाही तोपर्यंत विक्री करू नये, असे आवाहन केले आहे.
नवीन आल्याला वेगळा दर का?
• नवीन आल्याची वाहतूक करणे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचे असते.
• उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आल्याची वाहतूक होते. हा प्रवास लांबचा आहे.
• लांब पल्ल्याच्या वाहतुकीत नवीन आले खराब होते.
• नवीन आल्याला पाणी सुटल्याने ते कुजते आणि दुर्गंधी येते.
• अशा आल्याला दर कमी येत असल्याने प्रतवारी करणे आवश्यक असल्याचे व्यापारी सांगतात.
मिश्र आले घेण्याबाबत शेतकरी आग्रही का?
• शेतकऱ्याला गाडीमागे पाच ते सात हजारांचे नुकसान एकराचा विचार केला तर एकरी ८० ते ९० हजारांचे नुकसान.
• प्रतवारी करण्यात शेतकऱ्याचा वेळ जातो. दर कमी मिळतो.
• नवीन आले हेदेखील जुन्याचाच भाग ते दर्जात कुठेही कमी नाही.
• बाहेरच्या व्यापाऱ्यांच्या नावाखाली स्थानिकांकडून ही दर नाही.