मोहन मगदूम
लिंगनूर : मिरज पूर्व भागातील लिंगनूर, बेळंकी, सलगरे, संतोषवाडी, खटाव परिसरातील द्राक्षाचे क्षेत्र वाढले आहे. या भागातील शेतकरी नैसर्गिक संकटावर मात करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेत आहेत.
सध्या या शेतकऱ्यांनी आगाप छाटणी न घेता ऑगस्ट, सप्टेंबरऐवजी ऑक्टोबर छाटणी घेण्यास पसंती दर्शवली आहे. परिसरात फळ छाटणीला प्रारंभ झाला आहे.
गतवर्षी परिसरातील बागायतदारांनी जुलै, ऑगस्टमध्ये आगाप छाटण्या घेतल्या होत्या. मात्र, पावसामुळे तसेच दावण्याच्या प्रादुर्भावामुळे बागायतदारांना मध्येच बागा तयार सोडून दिल्या होत्या.
द्राक्ष मणी करून विक्रीसाठी आलेल्या बागा पावसामुळे एका रात्रीत नाहीशा झाल्या. त्यामुळे परिसरातील द्राक्ष बागायतदारांना गतवर्षी मोठा आर्थिक फटका बसला होता.
त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पावसाचा आणि बाजारपेठेचा अंदाज घेत ऑक्टोबर छाटणी घेण्यास सुरवात केली आहे. सध्या द्राक्षबागेतील कामासाठी मदभावी, लोकुर, मंगसुळी, सुभाषनगर, मालगाव अनेक भागांतील, शेतमजूर दाखल होत आहेत.
विशेष म्हणजे महिला कामगार मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. परिसरात द्राक्ष विक्री फेब्रुवारी ते मेदरम्यान होत असते. मात्र, गतवर्षी पूर्व भागातील द्राक्षांना देशातील व परदेशातील बाजारपेठ मिळाली नाही.
त्यामुळे उत्पादकांनी पिकवलेली द्राक्ष उत्पादकांनी स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल दराने विकली. याचा आर्थिक मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. दरम्यान, यंदा द्राक्ष बागायतदार सावध पवित्रा घेत आहेत.
द्राक्ष उत्पनात घट
मिरज पूर्व भागातील द्राक्ष बागायतदारांनी मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान अवगत करत परिसरातील द्राक्षे सातासमुद्रापार पाठवली आहेत. मात्र, यंदा गतवर्षी पडलेल्या अवकळी पावसामुळे व दारामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यातून बागायतदारांनी कष्टाने बागा जपल्या आहेत. मात्र, सध्या ढगाळ वातावरणामुळे नुकसान होत आहे. जास्त खर्च व उत्पादन कमी आणि दरात घसरण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दरवर्षी मिरज पूर्व भागातील द्राक्ष उत्पादक छाटणी जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये घेत होते. मात्र यंदा द्राक्षानां मिळणारी बाजारपेठ व पावसाचा अंदाज घेत बागायतदारांनी द्राक्ष छाटण्या ऑक्टोबरमध्ये घेतल्या आहेत. सध्या छाटण्या सुरू केल्या आहेत. मात्र वातावरणात बदल होत असल्याने शेतकरी सावध भूमिकेत आहेत. - संजय यादवाडे, द्राक्ष उत्पादक, लिंगनूर